

मुंबई: कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयातील रक्तपेढीला नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तीन दिवसांच्या निलंबनाचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र, या आदेशाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. रक्तपेढी प्रशासनाने कारवाईविरोधात अपील केल्याने निलंबनाची प्रक्रिया पुढे ढकलली गेल्याचे समजते.
एफडीएच्या तपासणीत रक्तपेढीतील मनुष्यबळ, कर्मचाऱ्यांची पात्रता, नोंदवही आणि यंत्रसामग्रीच्या देखभालीशी संबंधित त्रुटी आढळल्याची माहिती आहे. आवश्यक संख्येने पात्र तंत्रज्ञ उपलब्ध नसल्याचेही तपासणीत निदर्शनास आले.
या त्रुटींप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने एफडीएला स्पष्टीकरण दिले असून, आवश्यक कागदपत्रे व नोंदी सादर केल्याचे सांगण्यात आले आहे. यंत्रसामग्रीच्या देखभाल-दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असून सर्व यंत्रे कार्यरत असल्याचा दावाही प्रशासनाने केला आहे.
पात्र तंत्रज्ञांची वानवा
रक्तपेढीच्या कामकाजासाठी प्रशिक्षित आणि पात्र तंत्रज्ञांची आवश्यकता असते. मात्र, आवश्यकतेच्या तुलनेत पात्र तंत्रज्ञांची संख्या कमी असल्याचे समोर आले आहे. चांगल्या वेतनाच्या संधी मिळाल्यानंतर प्रशिक्षित कर्मचारी नोकरी सोडत असल्याने मनुष्यबळाची समस्या निर्माण होत असल्याचे सांगण्यात येते.
रक्तपेढीत काम करण्यासाठी आवश्यक पात्रता आणि अनुभव पूर्ण केल्यानंतरच कर्मचाऱ्यांना मान्यता मिळत असल्याने मनुष्यबळ वाढविणे हे प्रशासनासमोर आव्हान ठरले आहे.
आधुनिक रक्तघटक केंद्राचा प्रस्ताव
रुग्णालयात आधुनिक रक्तघटक केंद्र उभारण्याचा प्रस्तावही पुढे नेण्यात येत आहे. सध्या रक्तपेढीत संपूर्ण रक्ताचा वापर प्रामुख्याने होत असला, तरी आधुनिक उपचारांमध्ये लाल रक्तपेशी, रक्तबिंबिका आणि इतर रक्तघटकांची गरज अधिक असते.
सार्वजनिक-खासगी सहभागातून हे केंद्र उभारण्याचा विचार असून, सुविधा सुरू झाल्यास रुग्णांना आवश्यक रक्तघटक रुग्णालयातच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सध्या आपत्कालीन परिस्थितीत रक्त किंवा रक्तघटकांची गरज भासल्यास इतर रक्तपेढ्यांशी केलेल्या सामंजस्य करारांद्वारे रक्त उपलब्ध करून दिले जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.