

प्रकाश साबळे
मुंबई: कांदिवलीतील १२० फुटी डीपी रोडच्या भूमिपूजनापासून सुरू झालेली श्रेयवादाची लढाई शनिवारी उद्धघाटनावेळीही कायम राहिली. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते या रस्त्याचे उद्घाटन झाले. मात्र आपल्यामुळेच हा रस्ता कसा झाला हे सांगण्यात भाजपा आमदार अतुल भातखळर आणि शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्यात चढाओढ पाहावयास मिळाली. कार्यक्रम संपताच कार्यकर्तेही एकमेकांना भिडल्याने वातावरण झाले होते.
भातखळर यांनी या रस्त्यासाठी केलेला संघर्ष यावेळी कथन केला, तर सुर्वे यांनी गरिबांना त्रास द्यायचा नाही. जो त्रास देईल, त्याला सोडायचे नाही, असा थेट इशाराच दिला. त्यानंतर आमदार प्रवीण दरेकर यांनीही या श्रेयवादात उडी घेतली.
प्रकाश सुर्वे आणि अतुल भातखळकर या दोन्ही आमदारांचा हा रस्ता हाेण्यासाठी मोठा वाटा आहे. पण माझाही यात खारीचा वाटा आहे. मात्र आधीच श्रेयवाद सुरू आहे, त्यात तिसर्याने त्यात उडी मारणे योग्य नाही, असा टोला मारला. शेवटी मंत्री पीयूष गोयल यांना या रस्त्यासाठी सर्वांनीच खूप मेहनत घेतली असे सांगत सर्वांचे आभार मानले.
यावेळी रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, आमदार प्रवीण दरेकर, आमदार योगेश सागर,माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. मंत्री भरत गोगावले यांनी ज्यांना कुणाला श्रेय घ्यायचे आहे, ते घ्यावे.
परंतु कार्यकर्त्यांना एकमेकांसोबत चांगले वागावे. आम्ही ठाकरेंना सोडून तुमच्यासोबत आलो आहोत. सर्वांना युतीमध्ये चांगले दिवस आले आहेत. यामुळे आता मिठाचा खडा टाकू नका, असे भावनिक आवाहन शेवटी केले.
कायर्क्रम संपल्यानंतर एक कार्यकर्ता शिवीगाळ करू लागला. त्याला भाजप कार्यकर्ते यांनी मारहाण केली. त्यामुळे काहीसा तणाव निर्माण झाला. मात्र पोलिसांनी शिवीगाळ करणार्याला पकडून समता नगर पोलीस चौकीत नेल्याने तणाव निवाळला.
मी २०१४ पासून या रस्त्याचे काम हाती घेतले. महिंद्रा कंपनीनेही कुठलीही अट न टाकता बाधित जागा मोकळी करून दिली. आता हा रस्ता पूर्ण झाला असून, येथून अर्ध्या तासात मुलुंडला पोहोचता येणार आहे. एवढा महत्वाचा हा रस्ता आहे. पुढे क्रांतीनगर ते गोरेगावपर्यंतचा रूंदीकरणाचा रस्ताही आम्ही लवकरच करून दाखवू.
- अतुल भातखळकर, आमदार
येथील १२० फूट डीपी रोडसाठी सर्वांचीच मेहनत आहे. येथील नागरिकांचा मी आभारी आहे की, त्यांनी ३० वर्षे ही समस्या सहन केली. ज्यांची घरे गेली त्यांनाही घरे मिळणार. पीएपी प्रकल्पात पहिला अधिकार स्थानिकांचा असेल. स्थानिकांना घर मिळणार नाही, तोपर्यत बाहेरील लोकांना घर देता येणार नाही.
- पीयूष गोयल,केंद्रीय मंत्री
नुसता रस्ता बनविणे महत्वाचे नाही. घरे देणे महत्वाचे आहे. ३७ लोक अजूनही अपात्र आहेत. लोखंडवाला येथील काही हुशार लोक न्यायालयात गेले होते. मात्र तरीसुद्धा आपण ९० टक्के लोकांना घरे देण्यास यशस्वी ठरलो. लोकांनी अजिबात घाबरून जावू नये, कुणी कितीही काही म्हणाले तरी घरे मिळतील.
- प्रकाश सुर्वे, आमदार, शिवसेना, शिंदे गट