जोगेश्वरी : जोगेश्वरी पूर्वेतील सर्वोदय नगर येथील एसआरए आदर्श मेघवाडी सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये भीषण आग लागण्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. या इमारतीतील रहिवाशी शिवकुमार विश्वकर्मा यांच्या आठव्या मजल्यावरील राहत्या फ्लॅटमध्ये आग लागून घर पूर्णपणे जळून खाक झाले. प्राथमिक माहितीनुसार, जळता दिवा सोफ्यावर पडल्याने ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
विश्वकर्मा यांनी लक्ष्मीपूजना निमित्त नवीन गाडी खरेदी केली होती, त्या गाडीची पूजा करण्यासाठी संपूर्ण कुटुंब इमारतीच्या आवारात खाली गेले असतानाच फ्लॅटमध्ये भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच विश्वकर्मा हे घराजवळ पोहोचले. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते.
या आगीत कपाट, फ्रिज, वॉशिंग मशीन, बेड, लाकडी साहित्य, किचनमधील साहित्य संपूर्ण जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
फायर सिस्टम कार्यान्वित असती तर...
सोसायटीतील रहिवाशांनी विकासकावर गंभीर आरोप केला असून, इमारतीतील फायर सिस्टीम बंद अवस्थेत असल्यामुळे अलार्म वाजला नाही. अलार्म न वाजल्यामुळे आगीची तीव्रता आणि आग लागण्याची घटना लक्षात न आल्यामुळे घर संपूर्ण जळाले.
या घटनेला विकासकाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप सोसायटीने केला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा विकासकांच्या जबाबदारीचा आणि इमारतीतील सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.