

माथेरान : मिलिंद कदम
निसर्गाने या भूतलावर असंख्य विलोभनीय आकर्षणे निर्माण केली आहेत. नयनरम्य देखावे, विस्तृत निसर्गाची कलाकृती डोळ्यांचे पारणे फेडणारी आहेत. त्यातील एक म्हणजे रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील निसर्गाच्या कुशीत वसलेले एक सुंदर टुमदार रमणीय पर्यटनस्थळ अर्थातच सर्वाचेच आवडते ठिकाण म्हणजे माथेरान होय. समुद्र सपाटीपासून 827 मीटर उंचीवरील हे अनेक नैसर्गिक कलाविष्काराने नटलेले छोटेसे खेडे वजा शहर आहे.
माथेरान हे पूर्वीच्या काळात एका खडकावर वसलेले असून या गावाची निर्मिती आणि शोध त्याकाळात 1850 मध्ये ब्रिटिश राजवटीत ठाण्याचे कलेक्टर ह्युज मॅलेट यांनी लावल्यावर त्यानंतर अनेकांनी अर्थातच पारसी समाजातील मंडळींनी आपल्या वास्तू बंगल्याच्या स्वरूपात उभारलेल्या आहेत. एकंदरीतच माथेरानच्या डोंगरमाथ्यावर 1670 एकरांचा भूभाग म्हणजे 52 किलोमीटर परिसरात जवळपास दोनशेहून अधिक बंगले आहेत.सध्यातरी पाच हजार लोकसंख्या असलेले हे गाव स्थानापन्न झालेले आहे.
अनेक ब्रिटिश नामावली प्रमाणे एकूणच 38 पॉईंट्स जरी असले तरी त्यातील महत्वाचे दहा पॉईंट्स हेच खरे पाहण्याजोगे आहेत.यामध्ये पाच पॉईंट्सच्या सर्कलमधील एको, हनिमून,मलंग,लुईझा पॉईंट हे मुख्य पॉईंट्स आहेत. तर सात पॉईंट्सच्या सर्कल मध्ये अलेक्झांडर, रामबाग, चौक, लिटिल चौक,वन ट्री हिल हे पॉईंट्स पाहण्याजोगे आहेत. बारा पॉईंट्समध्ये याच रांगेतील एको, मलंग पॉईंट,लुईझा पॉईंट सह सनसेट पॉईंट (पार्क्युपाईन पॉईंट) हे महत्वाचे पॉईंट्स आहेत. सुर्योदयासाठी पॅनोरमा, गारबट हे मुख्य पॉईंट्स आहेत, परंतु सध्या पॅनोरमा पॉईंटच्या रस्त्याचे नूतनीकरण काम सुरू आहे.
बाराही महिने इथला निसर्ग सर्वांनाच साद घालून आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असतो. नेरळ येथून समोर दिसणारा गर्वाने छाती काढून अभिमानाने आपल्याजवळ या म्हणणारा विशाल कातळावर विसावलेला आहे. चोहोबाजूंनी काळ्याकभिन्न थरावर थर अशाच स्वरूपात असून या डोंगरावरील सर्वच माती ही तांबड्या लाल रंगाची म्हणजे निसर्गाचे सौभाग्य म्हणावे लागेल. आजमितीपर्यंत इथल्या स्थानिकांनी हे सौभाग्य कायमस्वरूपी टिकवून ठेवलेले आहे.मोटार वाहन अंतर्गत येऊन डांबराचा काळा डाग म्हणजे पूर्वापार असलेल्या लाल मातीच्या रस्त्यावर त्यागाचे प्रतीक अद्यापही लावलेले नाही. त्यामुळेच इथे आजही गारवा कायम स्वरूपी जाणवत आहे.सर्वत्रच फिरण्यासाठी हातरिक्षा आणि घोडयावर बसून भ्रमंती करता येते.
पर्यटकांचे सतत ओघ...
मुंबई पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर नेरळ या मध्यवर्ती ठिकाणी उतरल्यावर माथेरानचे प्रवेशद्वार दस्तुरी नाका सात किलोमीटर अंतरावर आहे. तर मिनिट्रेनने येताना एकूण 210 नागमोडी वळणे पार करीत दीड ते दोन तासात माथेरानला येता येते. या प्रवासाच्या आकर्षणातूनच पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात सातत्याने येत असतात.