Jogeshwari Crematorium: मोबाईलचा टॉर्च लावून अंत्यविधी आटोपण्याची रहिवाशांवर वेळ; महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त

जोगेश्वरीतील हिंदू स्मशानभूमीत मुख्य शेडमधील विद्युत दिवे बंद,
Jogeshwari Crematorium
Jogeshwari CrematoriumPudhari
Published on
Updated on

विशाल नाईक

जोगेश्वरी: मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करूनही जोगेश्वरी पूर्वेतील प्रतापनगर येथील कै. राजेश्वर वामन रागिनवार हिंदू स्मशानभूमीच्या नागरी समस्या गेल्या काही महिन्यापासून ‘जैसे थे’च असल्याचे दिसून येत आहे.

या स्मशानभूमीत सामान्य नागरिकांना अंत्यविधी करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अंत्यविधीच्या ठिकाणी वीजच नसल्यामुळे मोबाईलची टॉर्च लावून विधी करावा लागल्याचा प्रकार या स्मशानभूमीत रविवारी रात्री साडे दहाच्या दरम्यान घडला.

Jogeshwari Crematorium
Mumbai Memory Clinic: मुंबईत बहुविशेषज्ज्ञ ‘मेमरी क्लिनिक’

पालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा आणि प्रशासकीय असंवेदनशीलतेचा एक अत्यंत विदारक प्रकार जोगेश्वरी पूर्व परिसरात घडला आहे. ज्या ठिकाणी शोकाकुल अवस्थेते नागरिक आपल्या व्यक्तीला अखेरचा निरोप देण्यासाठी येतात, त्याच स्मशानभूमीत शवदहनासाठी विजेची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांना चक्क मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात अंत्यविधी उरकावे लागले आहेत.

एका बाजूला अंत्यसंस्काराच्या ठिकाणी शेडमध्ये दोन दिवस काळाकुट्ट अंधार पसरलेला असताना, दुसऱ्या बाजूला कर्मचाऱ्यांच्या केबिनमध्ये मात्र वीज व एसी अखंडपणे सुरू होता. नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करणाऱ्या या कारभारावर आता रहिवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सदर घटना जोगेश्वरी पूर्व येथील राजेश्वर वामन रागिनवार हिंदू स्मशानभूमीत घडली आहे. प्रतापनगर परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाचे प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले होते. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांचे कुटुंबीय, व परिसरातील नागरिक अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन स्मशानभूमीत पोहोचले. ज्या ठिकाणी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात, त्या मुख्य शेडमधील पथदिवे व सर्व वीज पुरवठा पूर्णपणे खंडित अवस्थेत होता.

Jogeshwari Crematorium
Shahapur Bus Brake Failure: ब्रेक फेल, समोर दरी अन् बसमध्ये ३० प्रवासी; चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली

अंधुक प्रकाशात अंत्यविधीचे सोपस्कार

स्मशानभूमीतील वीज पुरवठा मागील आठवड्यापासून खंडित असूनही प्रशासनाकडून कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नव्हती. अखेर मृतदेहाची विटंबना टाळण्यासाठी उपस्थित नागरिकांनी आपापल्या मोबाईलचे टॉर्च आणि बॅटऱ्या पेटवून त्या अंधुक प्रकाशात अंत्यविधीचे सोपस्कार पूर्ण केले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news