

मुंबई : जेजे रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि वैद्यकीय शिक्षण विभागावर त्यांच्या विभाग प्रमुखांवर कारवाई करण्यासाठी दबाव आणणार्या निवासी डॉक्टरांविरुद्ध मोर्चा उघडला आहे. बुधवारी (दि.16) एका महिला निवासी डॉक्टरने कर्तव्यावर असताना बुधवारी दुपारी झोपेच्या गोळ्या खाऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता.
महिला निवासी डॉक्टरने तिच्या जीवनयात्रा संपवण्याच्या प्रयत्नासाठी बालरोग विभाग प्रमुख डॉ बेला वर्मा यांना जबाबदार धरले होते. त्यानंतर त्यांना पदावरून हटवण्यात आले. या प्रकरणाची सोमवारी (दि.21) पुन्हा चौकशी होणार आहे.
यानंतर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न करणार्या महिला निवासी डॉक्टरने केलेला निष्काळजीपणा उघडकीस आणला. एका वरिष्ठ डॉक्टरने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, 10 जुलै रोजी या महिला निवासी डॉक्टर आणि तिच्या सहकारी निवासी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका नवजात बाळाला अनेक तास वॉर्डमध्ये एकटे सोडण्यात आले.
फेब्रुवारी ते जुलै दरम्यान, महिला निवासी डॉक्टरला तिच्या युनिट प्रमुखांकडून 4 हून अधिक मेमो मिळाले आहेत. हे मेमो कर्तव्यावर उपस्थित न राहिल्याबद्दल, मुलांवर उपचार करण्यात निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल आणि प्रबंध पूर्ण न केल्याबद्दल देण्यात आले आहेत.
याबाबत बालरोग विभाग प्रमुख डॉ बेला वर्मा यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या तृतीय वर्षीय विद्यार्थीने जीवनयात्रा संपवण्याच्या प्रयत्नांपूर्वी केलेल्या आरोपांचे खंडन केले. डॉ वर्मा सांगतात की, या मुलीच्या असायनमेंट पूर्ण करताना माहितीचा अभाव होता तो दुरुस्त करून मी पूर्ण करून आणायला सांगितले. तिचे जेजे मधील एका डॉक्टर सोबत प्रेम संबंध होते मात्र ते काही दिवसांपूर्वी संपले.
त्याचा तिला मानसिक त्रास होता, तिची आई देखील कर्करोगाने त्रस्त होती. त्यामुळे तिच्या 30 हुन अधिक रजा झाल्या होत्या अभ्यास झालेला नव्हता. त्यामुळे परीक्षेचं देखील दडपण तिला होत. त्यामुळे तिने जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला असावा. प्रत्येक गोष्टीचा माझ्याकडे पुरावा आहे. सध्याच्या विद्यार्थ्यांना नकार पचवता येत नाही, फक्त गोड बोलणारे शिक्षक आवडतात, चुका दाखविल्या की त्यांना त्रास होतो. ती क्लिनिकल नोट्समध्ये बनावट स्वाक्षर्या देखील करते आणि थीसिस अपूर्ण ठेवते. या वरिष्ठ डॉक्टरांच्या आरोपांबद्दल, महाराष्ट्र वरिष्ठ निवासी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अभिजित हेलगे म्हणाले की, चौकशीत सर्व तथ्ये बाहेर येतील. आम्ही निवासी डॉक्टरांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.