

मुंबई : हृदयरोगाचा धोका ओळखण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रातील पहिले प्रतिबंधक मॉडेल विकसित करण्यात आले आहे. या प्रणालीच्या मदतीने एखाद्या व्यक्तीला हृदयरोगाचा धोका किती आहे, हे डॉक्टर केवळ दोन मिनिटांत ओळखू शकणार आहेत. शनिवारी मुंबईतील खासगी रुग्णालयात या प्रणालीचे औपचारिक लाँचिंग करण्यात आले.
‘अँजाइना एक्स एआय’ असे या तंत्रज्ञानाचे नाव असून जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने हे विकसित केले आहे. ही चाचणी एआयच्या मदतीने रुग्णाच्या काही प्राथमिक तपशिलांच्या आधारे काम करते. त्याच्या हृदयविकाराच्या जोखीम श्रेणीचे अचूक मूल्यांकन करता येते. या प्रणालीचा अभ्यास 2,035 व्यक्तींवर करण्यात आला. त्यामध्ये 62 टक्के लोक उच्च जोखीम गटात असल्याचे दिसून आले. 3 ते 5 टक्के लोक कमी जोखीम गटात, तर उर्वरित मध्यम जोखमीच्या गटात होते, अशी माहिती एआयचे संस्थापक नमन गोसालिया यांनी दिली. हे मॉडेल सरकारी रुग्णालयांमध्येही सुरू करण्यात येईल, असे ते म्हणाले.
हृदयरोगाचे निदान बर्याचदा उशिरा होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत असल्याचे ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अजित देसाई यांनी सांगितले. वेळीच जोखीम ओळखणे अत्यंत महत्त्वाचे असून, त्यामुळे संभाव्य हानी टाळता येऊ शकते.
रुग्णालयाच्या कार्डिओलॉजी विभागाचे संचालक आणि पद्मभूषण डॉ. अश्विन बी. मेहता म्हणाले, प्रगत एआयच्या सहाय्याने हृदयरोगाचा धोका इतक्या लवकर आणि अचूकपणे ओळखता येतो, हे आरोग्य व्यवस्थेसाठी एक क्रांतिकारी पाऊल ठरेल. सध्या ही चाचणी अवघ्या 108 रुपयांत उपलब्ध असून, पुढील काळात अधिकाधिक रुग्णालयांमध्ये तिचा विस्तार करण्यात येणार आहे.