

मुंबई : सध्या दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या तिसऱ्या दिवशी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी 26 अब्ज डॉलर्सच्या दोन गुंतवणूक सामंजस्य करारांवर औपचारिकरित्या शिक्कामोर्तब केले. यात एआयवर आधारित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील भागीदारीचा टाटा समूहासोबत केलेला 11 अब्ज डॉलर्सचा करार आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ इनोव्हेशन सिटी उभारण्याचा समावेश आहे.
भारत-स्वित्झर्लंड (बी-स्विस-एमएमआर) सहकार्याअंतर्गत 15 अब्ज डॉलर्सचा शाश्वत औद्योगिक विकास उपक्रम राबवण्यात येणार आहे. या दोन्ही भागीदाऱ्यांच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशाला प्रगत उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शाश्वत औद्योगिक वाढीसाठी जागतिक स्तरावर सक्षम केंद्र म्हणून पुढे आणणे हा उद्देश आहे.
टाटा समूहासोबतच्या धोरणात्मक भागीदारीद्वारे 11 अब्ज अमेरिकी डॉलर्सची कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित पायाभूत गुंतवणूक निश्चित करण्यात आली असून यामुळे नवोन्मेष व डिजिटल क्षमतांना गती मिळेल.भारत-स्वित्झर्लंड सहकार्यामुळे मुंबई महानगर प्रदेशात जागतिक दर्जाच्या शाश्वत औद्योगिक विकासपद्धती अमलात येतील.
कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण, गेमिंग, उत्पादन, लॉजिस्टिक्स आणि संलग्न क्षेत्रांमध्ये सुमारे 1.5 लाख थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार संधी उपलब्ध होतील. संशोधन व विकास, नवीकरणीय ऊर्जा, मूलभूत उद्योग, पर्यटन आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांतील गुंतवणुकीद्वारे दीर्घकालीन आर्थिक सक्षमता बळकट केली जाईल.