Domestic workers protest : बुक माय बाई, स्नॅपबीट, अर्बन कंपनीने घरेलू कामगारांना चक्क गुन्हेगार ठरवले
मुंबई : घरगुती कामासाठीच्या महिला पुरवणाऱ्या ब्रॅन्डेड कंपन्यांनी परंपरागत आणि वर्षानुवर्षे घरकाम करणाऱ्या महिला कामगारांची बदनामी चालवली असून, ही बदनामी असह्य झाल्याने घरेलू महिला कामगारांच्या संतापाचा अखेर उद्रेक झाला आणि त्या मिळून साऱ्या जणी गुरुवारी आझाद मैदानात उतरल्या.
आतापर्यंत घरेलू कामगार आणि त्यांना संघटित करणाऱ्या मान्यताप्राप्त संघटना असा विषय असल्याने राज्याने असा संघर्ष कधी पाहिला नाही. या घरेलू कामगार पुरवण्याच्या क्षेत्रात बूक माय बाई, स्नॅपबीट, अर्बन कंपनी यांसारख्या स्टार्टअप कंपन्या उतरल्या. सर्व घरेलू कामगार लोकांनी आपल्याकडूनच घ्यावेत या अट्टाहासाने मग परंपरागत घरेलू कामगार कसे गुन्हेगार असतात, त्यांचा कसा भरवसा देता येत नाही, असा अश्लाघ्य प्रचार बूक माय बाई, स्नॅपबीट, अर्बन कंपनी आदी व अन्य खासगी ॲप आधारित कंपन्यांनी सुरू केला.
या कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये तर घरकाम करणाऱ्या महिलांना संशयास्पद, अविश्वसनीय आणि “संभाव्य गुन्हेगार” म्हणून दाखवले आहे. विशेषतः बूक माय बाई या कंपनीच्या जाहिरातीत म्हटले आहे की, “10 पैकी 3 घरेलू कामगार महिला गुन्हेगार असू शकतात”.
या ॲप कंपन्यांच्या प्रचाराविरोधात तीव्र असंतोष व्यक्त करण्यासाठी गुरुवारी घरेलू महिला कामगारांनी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. या कंपन्यांच्या जाहिरातींमुळे लाखो कष्टकरी, प्रामाणिक आणि सन्मानाने काम करणाऱ्या घरेलू कामगार महिलांच्या प्रतिष्ठेवर गंभीर आघात झाला आहे. बूक माय बाई, स्नॅपबीट, अर्बन कंपनी व इतर काही कंपन्यांनी काही घरेलू कामगार महिलांचे फोटो त्यांच्या वेबसाईट व सोशल मीडियावर प्रसिद्ध करून त्यांची जाहीर बदनामी केली आहे. याकडे लक्ष वेधत घरेलू कामगारांनी राज्य सरकारपुढे आपल्या मागण्या ठेवल्या-
1. घरेलू कामगार पुरवणाऱ्या या ॲप आधारित सर्व कंपन्यांविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कठोर कारवाई करण्यात यावी.
2. घरेलू कामगार महिलांची बदनामी करणाऱ्या सर्व जाहिराती तत्काळ मागे घेण्याचे आदेश देण्यात यावेत.*
3. या कंपन्यांना घरेलू कामगार महिलांची जाहीर माफी मागण्यास भाग पाडावे.
4. अशा ॲप-आधारित व प्लेसमेंट करणाऱ्या कंपन्यांवर घरेलू कामगार कल्याण मंडळाद्वारा कायदेशीर नियंत्रण व नियमन लागू करण्यात यावे.
एकीकडे सरकार महिलांसाठी विविध योजना राबवून सन्मान व सुरक्षिततेची भाषा करते आणि आणि त्याच राज्यात दुसरीकडे खासगी कंपन्या महिलांना गुन्हेगार ठरवणाऱ्या जाहिराती करतात हा विरोधाभास महाराष्ट्रातील घरेलू कामगार महिलांमध्ये तीव्र संताप निर्माण करणारा आहे, याची जाणीव या आंदोलनात करून देण्यात आली.

