

मुंबई : वाढत्या पायाभूत सुविधांचा परिणाम म्हणून मुंबईतील घरांच्या किमतींमध्ये वाढ दिसून येत आहे. 2026 या वर्षात घरांच्या किमती 32 हजार रुपये प्रतिचौरस फूट ते 70 हजार रुपये प्रति चौरस फूट इतक्या असतील.
सध्या वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूचे काम प्रगतीपथावर आहे. मेट्रो 3 भुयारी मार्गिकेचे वांद्रे-कुर्ला संकुल स्थानक सुरू होऊन आता एक वर्ष लोटले आहे. भविष्यात मेट्रो 2 ब मार्गिकेचे स्थानकही येथे सुरू होईल. सर्व सोयी-सुविधांचा विचार करता वांद्य्रातील घरांची किंमत यावर्षी 70 हजार ते 75 हजार रुपये प्रतिचौरस फूट असेल. ही किंमत महालक्ष्मी येथील घरांच्या बरोबरीची किंवा त्याहून अधिक आहे.
वांद्रे, महालक्ष्मीखालोखाल दादरच्या घरांच्या किमती आहेत. येथे 56 हजार ते 58 हजार प्रतिचौरस फूट इतका दर सुरू आहे. दादर हे पूर्वीपासूनच मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे घरांचे दर चढेच असतात. तसेच गेल्या वर्षभरापासून दादरला भुयारी मेट्रोची जोडणी मिळाली आहे. दादर-माटुंगा येथील जुन्या चाळींचा मोठ्या प्रमाणात पुनर्विकास सुरू आहे. त्यामुळे येथे मोठ्या आकाराची घरे निर्माण होतील व त्यांच्या किमतीही वाढत जातील. सांताक्रूझ येथील घरांचे दरही दादरइतकेच आहेत. सर्वात कमी दर बोरिवली, कांदिवली, मालाड, विक्रोळी, मुलुंड येथे आहे.