

ठाणे : ट्रेड विथ जॅझ अर्थात टीडब्ल्यूजे या कंपनीच्या नावाने गुंतवणूक करून मोठा परतावा देतो, असे आमिष दाखवून सुमारे 11 हजार लोकांना पंधराशे कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टीडब्ल्यूजे कंपनीचा मालक व व्यवस्थापकीय संचालक समीर नार्वेकर व त्याची पत्नी नेहा नार्वेकर तसेच संचालक अमित पालम या तिघांना अखेर ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी गुजरातमध्ये बेड्या ठोकल्या आहेत. गेले अनेक दिवस हे तिघे पोलिसांना गुंगारा देत होते.
ट्रेड विथ जॅझ (टीडब्ल्यूजे) असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने गुंतवणुकीवर उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवून तसेच सरकारी प्रकल्पांसाठी मोठे कंत्राट मिळवण्याचा दावा करून राज्यभरातील अनेक व्हीआयपी लोकांना आपल्या जाळ्यात ओढले होते. राज्यभरातील आठ जिल्ह्यांतून पोलिसांकडे समीर नार्वेकरच्या विरोधात प्रचंड तक्रारी आल्या होत्या. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. राज्यभरातील आठ जिल्ह्यांतून सुमारे 16 शाखांमधून टीडब्ल्यूजे कंपनीने 11 हजार लोकांकडून सुमारे 1500 कोटींची गुंतवणूक करून घेतली. मात्र, गेले सहा महिने कोणताच परतावा येत नसल्याने फसवणूक झाली हे लक्षात येताच अनेक गुंतवणूकदारांनी टीडब्ल्यूजे कंपनी व संचालकांविरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल केले.
सर्वप्रथम यवतमाळ येथे गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पुणे, चिपळूण, रत्नागिरी व अन्य ठिकाणी संचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. चारच दिवसांपूर्वी चिपळूण पोलिसांनी या प्रकरणातील एक आरोपी संचालक संकेश घाग याला डोंबिवलीत अटक केली. त्याला चिपळूण न्यायालयाने 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता कंपनीच्या मालकांसह पत्नी व अन्य एकाला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले.
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त पराग मणेरे हे वेगवेगळ्या पद्धतीने तपास करण्याबाबत प्रयत्नशील होते. तपास अधिकारी माधवी राजेकुंभार यांच्यासह नितीन ओवळेकर, गुरुप्रसाद तोडणकर, निशिकांत पाटील, कविता कोळपे, योगेश चौगुले यांचा टीममध्ये समावेश होता. टीमने तब्बल आठवडाभर गुजरातमध्ये तळ ठोकून समीर नार्वेकर व त्याच्या पत्नीसह तिघांना ताब्यात घेतले आहे.