

Indigo Airlines Navi Mumbai
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले विमान ऑगस्टमध्ये उड्डाण घेईल, असे स्पष्ट संकेत मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असतानाच या विमानतळावरून रोज 18 उड्डाणे करण्याची घोषणा इंडिगो एअरलाईन्सने केली आहे. नवी मुंबईतून उड्डाणे जाहीर करणारी ही पहिली कंपनी ठरली आहे.
इंडिगो एअरलाईन्स आणि अदाणी एअरपोर्ट होल्डींग लिमिटेड यांच्यात झालेल्या सामंजस्य करारा नुसार नवी मुंबई विमानतळावरून सुरुवातील 18 उड्डाणे दिवसाला होतील आणि 15 शहरांकडे ही विमाने जातील. नंतर ही उड्डाण संख्या 79 पर्यंत वाढवली जाईल, त्यात नोव्हेंबर 25 पासून सुरू होणार्या 14 आंतरराष्ट्रीय उड्डाणांचाही समावेश असेल. त्यानंतर वर्ष भराने म्हणजेच नोव्हेंबर 2026 पासून ही उड्डाण संख्या 140 वर जाईल.
नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनालाच विमानांचे उड्डाण करणारी इंडिगो ही पहिली एअरलाईन्स ठरणार असल्याचे इंडिगोचे मुख्यकार्यकारी अधिकारी पीटर एलबर्स यांनी सांगितले आहे. तर अदानी एअरपोर्ट होल्डींगचे मुख्यकार्यकारी अधिकारी अरुण बंन्सल म्हणाले, इंडिगो आणि अदानीच्या भागिदारीमुळे नवी मुंबई विमानतळ आंतरराष्ट्रीय आणि आंतरदेशीय विमानप्रवास क्षेत्रात आपले भक्कम स्थान निर्माण करेल. आमच्या भागिदारीने नवी मुंबई विमातळाची भूमिकाही भक्कम होईल.
नवी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन एप्रिल किंवा मेमध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, हे उद्घाटन येत्या ऑगस्टमध्ये होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी एका मुलाखतीत स्पष्ट केले. मेट्रो, लोकल आणि वॉटर टॅक्सीने जोडलेगेले हे पहिले विमानतळ असेल असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.
उद्घाटन झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात या विमानतळावरून वर्षाला 20 दशलक्ष प्रवासी प्रवास करतील आणि 0.5 मिलियन मेट्रीकटनची वाहतूक होईल. विमानतळाचे काम पूर्ण झाल्यानंतर हीच क्षमता अनुक्रमे 90 दशलक्ष प्रवासी आणि 3.2 मिलियन मेट्रीकटन माल वाहतूक अशी होईल.