

मुंबई विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. १७ मे २०२५, शुक्रवारपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी लागणाऱ्या तिकीटांच्या किमतींमध्ये वाढ होणार आहे. ही दरवाढ तात्पुरती नसून ती ३१ मार्च २०२९ पर्यंत लागू राहील. त्यामुळे आगामी चार वर्षांपर्यंत मुंबईतून हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागतील. या दरवाढीमुळे सामान्य प्रवाशांपासून ते नियमित प्रवास करणाऱ्यांपर्यंत सर्वांवर त्याचा परिणाम होणार आहे.
ही दरवाढ विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरण (AERA) कडून प्रवासी सुविधा निर्माण शुल्क (User Development Fee – UDF) लागू करण्यास मंजुरी मिळाल्यानंतर करण्यात आली आहे.
मुंबई विमानतळावरून जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांना या शुल्काचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. या नवीन निर्णयानुसार, देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाकडून 175 रुपये, तर आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांकडून 615 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. हे शुल्क विमान तिकीटामध्ये समाविष्ट असेल, त्यामुळे ते स्वतंत्रपणे भरावे लागणार नाही, मात्र एकूण तिकीट खर्च वाढेल.
विशेष बाब म्हणजे, हे शुल्क फक्त मुंबई विमानतळावरून होणाऱ्या प्रवासासाठी लागू असणार आहे आणि येणाऱ्या तसेच जाणाऱ्या दोन्ही प्रकारच्या प्रवाशांवर ते लागू होईल. म्हणजेच, मुंबईहून देशांतर्गत किंवा परदेशात प्रवास करणारे तसेच मुंबईत येणारे प्रवासी या शुल्कवाढीच्या कक्षेत येणार आहेत.
विमानतळ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे की, हे शुल्क प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी आणि भविष्यातील पायाभूत प्रकल्पांसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने आकारले जात आहे.
दरम्यान, विमान प्रवासाचा खर्च आधीच इंधन दर, टॅक्सेस आणि इतर सेवा शुल्कांमुळे वाढलेला आहे. त्यात आता या नव्या शुल्कवाढीमुळे हवाई प्रवास आणखीनच खर्चिक ठरणार आहे. यामुळे अनेक प्रवासी आणि प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही प्रवासी यामुळे हवाई प्रवासाऐवजी रेल्वे किंवा बसचा पर्याय निवरण्याची शक्यता वर्तवत आहेत. एकूणच, मुंबई विमानतळावरील ही शुल्कवाढ प्रवाशांच्या बजेटवर परिणाम करणारी ठरणार असून, याचे दीर्घकालीन परिणाम प्रवासी संख्येवरही होण्याची शक्यता आहे.