Cancer Awareness Campaign : कर्करोगाची भीती नको, वेळीच तपासणी करा!

‘मुँह दिखाई’ चित्रपटातून तंबाखू सेवन दुष्परिणामावर जनजागृती
Cancer Awareness Campaign
Cancer Awareness Campaignpudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : कर्करोग म्हटले की अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. मात्र, तोंडाचा, स्तनाचा आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यांसारख्या आजारांचे वेळीच निदान झाल्यास प्रभावी उपचार शक्य आहेत. त्यामुळे कर्करोगाची भीती न बाळगता नियमित तपासणी करून घेण्याबाबत जनजागृती करण्यासाठी इंडियन कॅन्सर सोसायटी अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम सांगणारा ‘मुँह दिखाई’ हा विशेष चित्रपट तयार करण्यात आला असून, धूम्रपान सोडण्याचा निर्धार करणाऱ्यांसाठी विशेष दुहेरी अंगठीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सध्या अनेक नागरिक नियमित आरोग्य तपासणी करून घेतात; मात्र कर्करोगाच्या तपासणीकडे दुर्लक्ष करतात. भीती आणि गैरसमजांमुळे अनेक रुग्ण उपचारासाठी उशिरा पोहोचतात. प्रत्यक्षात कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास उपचारांची शक्यता वाढते. त्यामुळे नागरिकांनी नियमित तपासणीला प्राधान्य द्यावे, हा संदेश या मोहिमेतून दिला जात आहे.

Cancer Awareness Campaign
Mahalaxmi Racecourse Construction : महालक्ष्मी रेसकोर्सवरील बांधकामाला मनपाचा दणका

तंबाखूविरोधी जनजागृतीसाठी तयार करण्यात येणारे चित्रपट अनेकदा भीतीदायक स्वरूपाचे असतात. त्यामुळे प्रेक्षक अशा दृश्यांकडे दुर्लक्ष करतात. ही बाब लक्षात घेऊन दैनंदिन जीवनातील प्रसंगांशी जोडणारा आणि सहजपणे मनापर्यंत पोहोचणारा ‘मुँह दिखाई’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम आणि निरोगी जीवनाचे महत्त्व यातून अधोरेखित केले आहे. विविध माध्यमांद्वारे टप्प्याटप्प्याने हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

धूम्रपान सोडण्यासाठी विशेष अंगठी

धूम्रपान सोडण्याचा निर्णय घेतलेल्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष दुहेरी अंगठी तयार करण्यात आली आहे. ही अंगठी दोन बोटांमध्ये घालायची असून, ती घातल्यानंतर हातात सिगारेट पकडणे सहज शक्य होत नाही. अर्थात, धूम्रपान पूर्णपणे रोखणारे साधन म्हणून नव्हे, तर धूम्रपान सोडण्याच्या निर्धाराची सतत आठवण करून देणारे माध्यम म्हणून तिची रचना करण्यात आली आहे. या अंगठीमुळे संबंधित व्यक्तीच्या धूम्रपानमुक्तीच्या संकल्पाची इतरांनाही जाणीव होते.

Cancer Awareness Campaign
Raigad Illegal Fishing : मांडवा समुद्रात एलईडी मासेमारीवर मत्स्यव्यवसाय विभागाचा छापा

कर्करोगाविषयी जनजागृतीचा उपक्रम

कर्करोगाविषयीची भीती दूर करणे, नियमित तपासणीचे महत्त्व पटवून देणे आणि तंबाखू व धूम्रपानापासून दूर राहण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे, ही या मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. आजार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा त्याचे वेळीच निदान आणि प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे असल्याचा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.