

मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्सवरील रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (आरडब्ल्यूआयटीसी) परिसरातील प्रस्तावित बांधकामावर मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. वृक्ष प्राधिकरणाने दिलेल्या परवानगीतील अटींचे उल्लंघन करून वृक्षतोड केल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता संबंधित बांधकाम तातडीने थांबवण्याची नोटीस जी-दक्षिण विभागाने बजावली आहे. त्यामुळे रेसकोर्सवरील बांधकामाचा विषय वादात सापडला आहे.
महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने २८ नोव्हेंबर २०२५ रोजी आरडब्ल्यूआयटीसीला वृक्षतोड आणि पुनर्रोपणासाठी परवानगी दिली होती. त्यानुसार १३ वृक्ष तोडणे, १२ वृक्षांचे पुनर्रोपण करणे आणि ४३ वृक्ष जागेवर कायम ठेवणे बंधनकारक होते. मात्र, ११ ऑगस्ट २०२६ रोजी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत जागेवर कायम ठेवायच्या ४३ वृक्षांपैकी आठ वृक्ष आढळून आले नाहीत. तसेच पुनर्रोपणासाठी मंजुरी दिलेल्या १२ वृक्षांपैकी दोन वृक्षही जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मंजूर परवानगीच्या अटींचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला.
या प्रकरणी सहाय्यक उद्यान अधीक्षकांनी ३० सप्टेंबर २०२६ रोजी ताडदेव पोलिसांना पत्र पाठवून संबंधितांविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती. यापूर्वी २१ ऑगस्ट २०२६ रोजी ताडदेव पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ अंतर्गत पुढील कारवाई करण्याची मागणी महापालिकेने केली आहे.
दरम्यान, वृक्षतोडीच्या प्रकरणानंतर बांधकाम परवानगीच्या अटींचे पालन न केल्याचा मुद्दाही समोर आला आहे. जी-दक्षिण विभागाच्या नामनिर्देशित अधिकाऱ्यांनी २९ ऑक्टोबर २०२६ रोजी काम थांबवण्याची नोटीस बजावली. सहाय्यक उद्यान अधीक्षक व इमारत प्रस्ताव विभागाने दिलेल्या पत्रांमधील निर्देशांचे पालन न झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांना २४ तासांच्या आत सक्षम प्राधिकरणाची मंजूर बांधकाम परवानगी सादर करण्यास सांगण्यात आले आहे. अन्यथा बांधकाम हटवण्याची तसेच साहित्य आणि यंत्रसामग्री काढून टाकण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
उपलब्ध बांधकाम आराखड्यानुसार, रेसकोर्स परिसरात क्लब हाऊस, जिमखाना आणि बँक्वेट हॉल अशा स्वरूपाचे बांधकाम प्रस्तावित आहे. क्लब हाऊसच्या इमारतीत दोन तळघरांमध्ये वाहनतळ, तळमजल्यावर पॅडेल, बॅडमिंटन आणि स्क्वॉश कोर्ट, रेस्टॉरंट, तर पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर जलतरण तलाव, व्यायामशाळा, वाचनालय, मिनी थिएटर आदी सुविधा प्रस्तावित आहेत. तिसऱ्या ते सातव्या मजल्यांपर्यंत लॉजिंग सुविधा असून, तिसऱ्या व चौथ्या तसेच पाचव्या व सहाव्या मजल्यावर प्रत्येकी ३८ खोल्या, तर सातव्या मजल्यावर २५ खोल्या प्रस्तावित आहेत. या इमारतीची एकूण उंची ३१.९५ मीटर आहे. स्वतंत्र बँक्वेट हॉल इमारतीची उंची १४.७२ मीटर प्रस्तावित आहे.