Raigad Illegal Fishing : मांडवा समुद्रात एलईडी मासेमारीवर मत्स्यव्यवसाय विभागाचा छापा

'महालक्ष्मी प्रसन्न-२' नौकेसह ३० एलईडी दिवे आणि जनरेटर जप्त
Raigad Illegal Fishing
Raigad Illegal Fishingpudhari photo
Published on: 
Updated on: 

रायगड : रायगड जिल्ह्याच्या सागरी परिक्षेत्रात अनधिकृत आणि अवैध मासेमारी करणाऱ्यांवर मत्स्यव्यवसाय विभागाने मोठी धडक कारवाई केली आहे. मांडवा येथील समुद्रक्षेत्रात पहाटेच्या सुमारास गस्तीदरम्यान एलईडी दिवे व जनरेटरच्या साहाय्याने बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या एका नौकेला रंगेहात पकडण्यात आले असून, नौकेसह सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. सागरी जैवविविधतेला घातक ठरणाऱ्या एलईडी दिव्यांचा वापर रोखण्यासाठी विभागाने किनारपट्टीवर गस्त अधिक तीव्र केली आहे.

सागरी परिसंस्थेला हानी पोहोचवणाऱ्या एलईडी दिव्यांचा वापर करून मासेमारी करण्यावर शासनाने बंदी घातली असतानाही, रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत ही नौका समुद्रात कार्यरत होती. रायगड जिल्हा मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेद्वारे ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.२० वाजता मांडवा सागरी हद्दीत गस्त सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला. मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी महेश खरात यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

Raigad Illegal Fishing
Health Centre : स्मार्ट आरोग्य केंद्रांच्या निविदेवरून जि. प. स्थायी समितीत खडाजंगी !

वर्सोव्याच्या नौकेवर गुन्हा दाखल ही नौका वर्सोवा (मुंबई) येथील केशव पांडुरंग कोळी यांच्या मालकीची असून तिचे नाव 'महालक्ष्मी प्रसन्न-२' (नोंदणी क्रमांक IND-MH-2MM-5785) असे आहे. या कारवाईदरम्यान नौकेवरून तब्बल ३० एलईडी दिवे आणि १ जनरेटर जप्त करण्यात आले.

संबंधित नौका ताब्यात घेऊन मांडवा जेट्टीवर आणण्यात आली असून जप्त साहित्य सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रायगड-अलिबाग कार्यालयात जमा करण्यात आले आहे. या प्रकरणी 'महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१' व 'सुधारित अधिनियम, २०२१' अन्वये पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

राज्याच्या संपूर्ण किनारपट्टीचा विचार करता, बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या एकूण १,०४५ प्रकरणांमध्ये आतापर्यंत सुमारे १५ कोटी ४६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये एकट्या एलईडी व पर्ससीन नेटद्वारे होणाऱ्या अनधिकृत मासेमारी प्रकरणांतील दंडाची रक्कम सुमारे ७ कोटी ४९ लाख रुपये इतकी आहे.

Raigad Illegal Fishing
US Midterm Elections | ट्रम्प यांच्या राजकीय वर्चस्वाला लगाम : अमेरिकेच्या राजकारणाला नवी दिशा!

कोकण किनारपट्टीवर अशा कारवायांवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून गस्ती नौकांसोबतच आता आधुनिक ड्रोनद्वारेही टेहळणी केली जात असून, नियम मोडणाऱ्या नौकांवर कठोर दंडात्मक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

जिल्ह्यात १२ ते १५ नौकांवर कारवाई

रायगड जिल्ह्याच्या सागरी पट्ट्यात अलिबाग, उरण, मुरुड आणि श्रीवर्धन परिसरात अशा अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी वेळोवेळी विशेष मोहिमा राबविण्यात येत आहेत. या मोहिमांमध्ये आतापर्यंत एलईडी दिवे व जनरेटरचा बेकायदेशीर वापर करणाऱ्या सुमारे १२ ते १५ नौकांवर जप्तीसह दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अशा विध्वंसक पद्धतींमुळे स्थानिक पारंपरिक मच्छिमारांच्या उपजीविकेवर गदा येत असल्याने या कारवायांना वेग आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.