

Sanjay Raut on India-Pakistan match: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोक मारले गेले. त्यांच्या कुटुंबांचा आक्रोश आपण अजूनही पाहत आहोत. एकीकडे आपण पहलगामचा बदला घेण्यासाठीचे ऑपरेशन सिंदूर सुरू असल्याचे सांगत आहोत, तर दुसरीकडे अबुधाबीला भारत-पाक सामना खेळवला जात आहे. हे जनभावनेविरुद्ध आहे, असा भाजपवर हल्लाबोल करत १४ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान सामना होणार असून, या दिवशी ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून 'माझं कुंकू-माझा देश' आंदोलन होणार आहे, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (दि. ११) पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी संजय राऊत म्हणाले की, अबुधाबीला भारत-पाक सामना खेळवला जात आहे. "आम्ही पाकिस्तानचे कंबरडे मोडू," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले होते. तसेच "खून आणि पाणी एकत्र नाही वाहणार," असेही त्यांनी सांगितले होते. मात्र आता भारत क्रिकेट संघ पाकिस्तानबरोबर सामना खेळत आहे. आता खून आणि क्रिकेट एकत्र कसे, यावर भाजप, विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उत्तर द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
१४ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान सामना होणार असून, या दिवशी शिवसेनेची महिला आघाडी रस्त्यावर उतरणार आहे. 'माझं कुंकू-माझा देश' असं आंदोलन केलं जाईल. मोदींना महिला सिंदूर पाठवतील. ते अभियान सुद्धा आम्ही राबवणार आहोत. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा आमचा पक्ष निषेध करणार आहे. हा एक प्रकारचा देशद्रोह आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
शिवसेना ही मूळ विचारांपासून दूर गेली आहे, असे भाजप नेते म्हणतात. बाळासाहेब ठाकरे यांनी भारत-पाक सामन्याला कायम विरोध केला आहे. आम्ही आजही आमच्या विचारांवर ठाम आहोत. अमित शहा आम्हाला राष्ट्रभक्तीच्या गोष्टी शिकवतात, मात्र आता त्यांचे पुत्र भारतीय क्रिकेटचे सर्वेसर्वा आहेत. १४ सप्टेंबरला भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी भाजप नेत्यांची मुले अबुधाबीला जातील, असा टोलाही राऊत यांनी लगावला.