

India Bank Frauds 2025
मुंबई : आर्थिक वर्ष 2024-25मध्ये देशातील बँकांमध्ये झालेल्या घोटाळ्यांची संख्या 34 टक्क्यांनी कमी झाली आहे. मात्र, या घोटाळ्यांत अडकलेली रक्कम तिपटीने वाढून 36 हजार 14 कोटी रुपयांवर गेली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जाहीर केलेल्या वार्षिक अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. मार्च-2025 अखेरीस संपलेल्या आर्थिक वर्षात बँक घोटाळ्यांची संख्या गत वर्षाच्या तुलनेत 34 टक्क्यांनी घटून 23,953 वर आली आहे. या घोटाळ्यांमध्ये खासगी बँकांचा वाटा सर्वाधिक आहे. मात्र, घोटाळ्यांमध्ये अडकलेली सर्वाधिक रक्कम सरकारी बँकांशी निगडित घोटाळ्यांतील आहे. या घोटाळ्यांमध्ये 36 हजार 14 कोटी रुपये अडकले आहेत. घोटाळ्यांची रक्कम वर्षभरात तिपटीने वाढली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घोटाळ्यांबाबत केलेले स्वतंत्र वर्गीकरण काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे 2024-25 मध्ये 22 घोटाळ्यांच्या प्रकरणात अडकलेली रक्कम 18 हजार 674 कोटी रुपयांनी वाढली आहे. आरबीआयकडे एक लाख अथवा त्यावरील रकमेचा घोटाळा झाल्यास त्याची माहिती दिली जाते. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये खासगी बँकांमध्ये 14 हजार 233 घोटाळ्यांची नोंद झाली आहे.
एकूण घोटाळ्यांपैकी 59.4 टक्के घोटाळे खासगी बँकांमध्ये नोंदविले गेले आहेत. सरकारी बँकांमध्ये 6 हजार 935 (29 टक्के) घोटाळ्यांची नोंद झाली आहे. सरकारी बँकांंमधील घोटाळ्यांमध्ये अडकलेली रक्कम 25,667 कोटी (71.3 टक्के) आहे. खासगी बँकांमधील घोटाळ्यांमध्ये 10 हजार 88 कोटी रुपये अडकले आहेत.
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये डिजिटल पेमेंटमधील घोटाळ्यांची संख्या 13,516 आहे. एकूण घोटाळ्यांच्या 56.5 टक्के घोळ डिजिटल पेमेंटमध्ये झाले आहेत. त्यात अडकलेली रक्कम 520 कोटी रुपये आहे. कर्जवितरणात झालेल्या घोटाळ्यांची संख्या 7 हजार 950 आहे. यात अडकलेली रक्कम तब्बल 33 हजार 148 कोटी रुपये आहे. घोटाळ्यातील 92 टक्के रक्कम कर्जवितरणाशी संबंधित घोळातील आहे.