

नवी मुंबई: राजेंद्र पाटील
नवी मुंबईच्या टेक ऑफचा मूहूर्त आता काही तासांवर येऊन ठेपला असून भारताचे पहिले अत्याधुनिक ग्रीनफिल्ड विमानतळ म्हणून नोंद झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गुरुवारी 25 डिसेंबरला पहिले विमान झेप घेईल.
मुंबई, नवी मुंबई, पनवेलसह राज्यातील 29 महापालिकांची रणधुमाळी सुरू झाली असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या 8 ऑक्टोबर रोजी उद्घाटन झालेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवाशांच्या प्रत्यक्ष सेवेत 25 डिसेंबरपासून सुरू होत आहे.
मावळत्या वर्षात हे विमानतळ सुरू करण्याचे स्वप्न सिडकोने पाहिले ते ख््रािसमसच्या दिवशी साकार होत असून पहिल्याच दिवशी उड्डाणे आणि आगमन अशी 30 विमाने या विमानतळावर भिरभिरतील. विमानतळाच्या हवाई वाहतुकीचा शुभारंभ करण्यात इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, आकासा एअर व स्टार एअर या कंपन्या सहभागी असतील. गुरुवारी बेंगळुरू येथून निघालेले इंडिगोचे विमान नवी मुंबई विमानतळावर सकाळी 8 वाजता उतरलेल. आणि ते हैदराबादकडे सकाळी 8.40 वाजता झेप घेईल.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची इमारत कमळाकृती असून ही भव्य रचना आता विमानतळाची एक प्रभावी वास्तुशिल्पीय ओळख बनली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी ही या प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. महामार्ग, द्रुतगती मार्ग, उपनगरीय रेल्वे, मेट्रो मार्गिका, जलमार्ग अशा वाहतूक व्यवस्थेने या विमानतळाची कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत असेल.
भविष्यातील वाढ लक्षात घेऊन विकसित करण्यात आलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्राला नवे परिमाण देत, देशाचे नवे प्रवेशद्वार म्हणून उदयास येणार असल्याचा विश्वास सिडकोने व्यक्त केला.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रत्यक्ष सुरू होणे हे महाराष्ट्र शासन व सिडकोच्या पायाभूत सुविधा विकासाबाबत सातत्यपूर्ण बांधिलकीचे फळ होय. भविष्योन्मुख पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक विकास आणि जागतिक स्तरावरील कनेक्टिव्हिटीसाठी आम्ही कटिबद्ध राहिलो आणि आमच्या या प्रवासात आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या महामुंबईकरांचेही हे सामूहिक यश आहे.
विजय सिंघल, सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक