IIT Bombay Sahil Wakode Case: साहिल वाकोडे प्रकरणात IIT बॉम्बेची मोठी कारवाई; प्रा. सूर्यनारायण डुल्ला डीनपदावरून निलंबित

IIT Bombay Sahil Wakode Case: विद्यार्थ्यांना पाठवलेल्या ई-मेलनुसार, प्रा. डुल्ला यांना डीनपदाच्या जबाबदारीतून निलंबित करण्यात आलं आहे.
Prof Suryanarayana Doolla Suspended
Prof Suryanarayana Doolla Suspended Pudhari
Published on
Updated on

IIT Bombay Sahil Wakode Case: आयआयटी बॉम्बेचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संस्थेने मोठी कारवाई केली आहे. आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांना डीनपदावरुन निलंबित करण्यात आलं आहे. आयआयटी बॉम्बेच्या संचालकांनी विद्यार्थ्यांना ई-मेल पाठवून या निर्णयाची माहिती दिली.

साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर आयआयटी बॉम्बेतील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं. या प्रकरणात संस्थेने पारदर्शक चौकशी करावी, जबाबदारी निश्चित करावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसह मानसिक आरोग्याच्या सुविधांमध्ये सुधारणा करावी, अशा विविध मागण्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर प्रा. सूर्यनारायण डुल्ला यांना Deanship अर्थात डीनपदाच्या जबाबदारीतून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संचालकांनी विद्यार्थ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आली आहे.

साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर आंदोलन

साहिल वाकोडे हा आयआयटी बॉम्बेच्या एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. १८ सप्टेंबर रोजी तो त्याच्या वसतिगृहातील खोलीत मृतावस्थेत आढळला होता.

मृत्यूच्या काही तास आधी झालेल्या मिड-सेमिस्टर परीक्षेदरम्यान त्याने मोबाईल फोनचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. आयआयटी बॉम्बेच्या म्हणण्यानुसार, साहिलने परीक्षेतील प्रश्नपत्रिका एका एआय प्लॅटफॉर्मवर अपलोड करून उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र, या घटनेनंतर त्याच्यावर कोणतीही औपचारिक शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली नव्हती, असा दावा संस्थेने केला होता. त्याचं समुपदेशन करण्यात आलं होतं आणि या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर परिणाम होणार नाही, अशी माहितीही त्यांना देण्यात आली होती.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर महत्त्वाचा निर्णय

साहिल याच्या मृत्यूनंतर विद्यार्थ्यांनी आयआयटी बॉम्बेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन केलं. विद्यार्थ्यांनी प्रा. डुल्ला यांच्याविरोधात कारवाई करण्यासह साहिलच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली होती.

तसंच, प्राध्यापकांसाठी आचारसंहिता, मानसिक आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा, समुपदेशन व्यवस्था दुरुस्त करणे आणि संस्थेच्या शिस्तभंग प्रक्रियेत बदल करण्यासह विविध मागण्या विद्यार्थ्यांनी मांडल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आता प्रा. डुल्ला यांना डीनपदाच्या जबाबदारीतून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Prof Suryanarayana Doolla Suspended
Lalbaugcha Raja Video: लालबाग राजाच्या मंडपात शॉर्ट सर्किट; भाविकांमध्ये भीतीचे वातावरण, VIDEO व्हायरल

प्रा. डुल्ला यांच्यावर नेमका आरोप काय?

साहिल वाकोडे ज्या परीक्षेला बसला होता, त्या परीक्षेदरम्यान प्रा. सूर्यनारायण डुल्ला हे पर्यवेक्षक म्हणून उपस्थित असल्याचं सांगण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर साहिलशी संबंधित काही गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली होती.

मात्र, या आरोपांबाबत अंतिम निष्कर्ष निघालेला नाही. आयआयटी बॉम्बेच्या फॅकल्टी फोरमने यापूर्वी प्रा. डुल्ला यांचा बचाव केला होता. ते मंजूर शैक्षणिक प्रक्रियेनुसार आपली पर्यवेक्षकाची जबाबदारी पार पाडत होते आणि परीक्षेतील गैरप्रकाराची माहिती त्यांनी निर्धारित प्रक्रियेनुसार दिली होती, असं फॅकल्टी फोरमने म्हटलं होतं.

त्यामुळे डीनपदावरून निलंबन हा प्रशासकीय निर्णय आहे; याचा अर्थ प्रा. डुल्ला यांना प्राध्यापक पदावरूनही हटवण्यात आलं आहे, असा थेट अर्थ होत नाही.

Prof Suryanarayana Doolla Suspended
Mahesh Mote Apology: तोंडाला काळं फासलं, राज ठाकरेंच्या फोटो समोर लोटांगण घेतलं; महेश मोटेच्या माफीचा VIDEO चर्चेत

आता पुढे काय?

प्रा. डुल्ला यांना डीनपदाच्या जबाबदारीतून निलंबित केल्यानंतर साहिल वाकोडे प्रकरणातील पुढील चौकशी आणि संस्थेच्या निर्णयांकडे लक्ष लागलं आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर आयआयटी बॉम्बे प्रशासन पुढे कोणती पावलं उचलतं, हे महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, साहिल वाकोडेच्या पालकांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून, कुटुंबीयांनी जातीय छळाचा आरोप केल्यानंतर SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीही लागू करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचा तपास मुंबई क्राइम ब्रँचकडे सोपवण्यात आला आहे.

या सर्व घडामोडींमध्ये आयआयटी बॉम्बेने आता प्रा. सूर्यनारायण डुल्ला यांना डीनपदाच्या जबाबदारीतून निलंबित केल्याने प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news