

मुंबई : आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी संस्थेच्या प्लेसमेंट अँड ट्रेनिंग सेलच्या कामकाजावर असमाधान व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांनी सेलच्या पारदर्शकतेवर आणि निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ही माहिती इन्साईट, आयआयटीच्या अधिकृत विद्यार्थी प्रकाशनाद्वारे घेतलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.
'प्लेसमेंट्सः द ब्रोकन ब्रिज'
'प्लेसमेंट्सः द ब्रोकन ब्रिज' या मथळ्याखाली हा लेख प्रसिद्ध झाला. गेल्या काही वर्षांत आयआयटी मद्रास आणि आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांना मोठ्या संधी मिळत असताना, आयआयटी-बीचे विद्यार्थी मागे पडत असल्याचे या लेखातून उघड झाले आहे.
आयआयटीच्या १६ ऑक्टोबरच्या अंकात 'प्लेसमेंट्सः द ब्रोकन ब्रिज' या लेखात या सर्वेक्षणाबाबत काही बाबी ठळक झाल्या आहेत, गेल्या काही वर्षांत आयआयटी मद्रास आणि आयआयटी दिल्लीतील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या नोकऱ्या मिळत असल्याचे समोर आले, तर आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांना तुलनेने कमी संधी मिळत असल्याचेही स्पष्ट झाले. प्लेसमेंट प्रक्रियेत स्पष्टता, सातत्य आणि पारदर्शकतेचा अभाव आहे, असेही म्हणणे आहे. ३०९ पैकी २२८ विद्यार्थ्यांनी नमूद केले की, प्लेसमेंट सेलच्या अपारदर्शकतेमुळे यंदा कॅम्पसमध्ये कमी कंपन्या भेटीला आल्या.
तसेच, १६० विद्यार्थ्यांना कंपन्यांचे कॅम्पस भेटीचे स्लॉट ठरविण्याच्या प्रक्रियेची माहिती नव्हती, तर ३०६ पैकी १७५ विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांचे स्लॉट ठरविण्याची प्रक्रियेत स्पष्टता नाही, असेही म्हटले आहे.
प्लेसमेंट सेलने मात्र ही जबाबदारी विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि मागण्या यावर ढकलली आहे. "विद्यार्थी इतर आयआयटींमधील प्लेसमेंटबद्दल बोलतात, पण तिथली पद्धत आमच्या धोरणांशी जुळत नाही. कंपन्यांना त्यांचे कॅम्पस आवडलेले असतात. आमची काही धोरणे त्यांना मान्य नसतील. २०२१-२२ पासून आमच्या धोरणात बदल झालेला नाही, पण कंपन्यांचा दृष्टिकोन बदलला असावा. आम्ही इतर आयआयटींपेक्षा विद्यार्थी-केंद्रित आहोत."
आयआयटीमधील समस्या सोडवाव्यात
जास्तीत जास्त कंपन्या आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आता इतर आयआयटींनीही प्रगती केल्याने, कंपन्यांना निवडीसाठी मोठा पर्याय उपलब्ध केले आहेत. बाहेरील स्पर्धा व आयआयटी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ, याकडे लक्ष देवून आयआयटीमधील काही अंतर्गत समस्याही सोडवाव्या लागतील, असे एका प्राध्यापकाने सांगितले.