

UGC Action On Ragging
मुंबई : विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि भयमुक्त शैक्षणिक वातावरण देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) लागू केलेल्या रॅगिंगविरोधी नियमांचे पालन न केल्याबद्दल देशभरातील 89 शिक्षणसंस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या संस्थांमध्ये आयआयटी मुंबई, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि पुण्यातील स्पायसर डव्हेंटिस्ट विद्यापीठ या तीन प्रमुख शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.
नियमावलीच्या अंमलबजावणीत हलगर्जीपणा केल्याबद्दल यूजीसीने या संस्थांकडून पुढील 30 दिवसांत रॅगिंगविरोधी उपाययोजना आणि विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या प्रतिज्ञापत्रांचा विस्तृत अहवाल मागवला आहे. अन्यथा आर्थिक सहाय्य, संशोधन प्रकल्प निधी, मान्यता किंवा संलग्नता रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
यूजीसीने 2009 साली रॅगिंगविरोधी नियमावली लागू केली असून ती देशातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये बंधनकारक आहे. मात्र, काही नामांकित शिक्षणसंस्थांनीच नियमावलीकडे दुर्लक्ष केल्याचे निरीक्षण यूजीसीच्या अँटी-रॅगिंग मॉनिटरिंग एजन्सी, हेल्पलाईन कॉल्स आणि पाठपुरावा दरम्यान नोंदवण्यात आल्याचे समोर आले आहे.