Mumbai News |
मुंबई : मुंबईतील चेंबूर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शारीरिक संबंधाला नकार दिला म्हणून पत्नीला पतीने पेटवून दिले. या घटनेनंतर तो पळून गेल्याने आरोपी पतीविरुद्ध आरसीएफ पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
ही घटना शुक्रवारी साडेबारा वाजता चेंबूर येथील वाशीनाका परिसरात घडली. गंभीररीत्या भाजलेल्या पत्नीवर सायन रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर आहे. संशयित आरोपीचे नाव दिनेश आव्हाड (वय ४६) आहे. त्याची पत्नी घरकामासाठी जाते. शुक्रवारी, घरातील काम उरकून ती कामावर जाताना पतीने शारीरिक संबंधासाठी आग्रह धरला. मात्र, महिलेने नकार दिल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाला.
शारीरिक संबंधासाठी नकार देताच दिनेश याने तिचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला. यावरून दोघांमध्ये वाद अधिक वाढला. त्याचा राग आल्याने तिने स्वतःवर रॉकेल ओतून पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र काडी न लागल्याने तिच्या पतीने गॅसवर कागद पेटवून तो कागद तिच्या अंगावर फेकला. या घटनेनंतर महिलेला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे.
महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे आणि आरोपी यापूर्वीही महिलेला मारहाण करत होता का त्याचा तपास सुरू आहे. महिलेच्या वैद्यकीय अहवाल आणि तिच्या जबाबाच्या आधारे खटला पुढे चालवला जाईल.