Mumbai crime news: पत्नीला मारण्याचे ३ प्रयत्न फसले, चौथ्यांदा दिली सुपारी; एका खुणेमुळे पतीचा 'आत्महत्येचा' बनाव उघड!

Powai murder case: पवई येथील एका उच्चभ्रू वस्तीत झालेल्या महिलेच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे.
Mumbai crime news
Mumbai crime newsfile photo
Published on
Updated on

Mumbai crime news

मुंबई: पवई येथील एका उच्चभ्रू वस्तीत झालेल्या महिलेच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. ज्या घटनेला सुरुवातीला आत्महत्या समजले जात होते, तो प्रत्यक्षात पतीनेच सुपारी देऊन थंड डोक्याने पत्नीचा काटा काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पत्नीला संपवण्यासाठी पतीने यापूर्वी तीन वेळा प्रयत्न केले होते, मात्र अपयश आल्यानंतर अखेर चौथ्यांदा सुपारी देऊन तिची हत्या केली आणि नंतर आत्महत्येचा बनाव रचला. (Mumbai Crime News)

ही घटना १४ ऑक्टोबर २०२४ रोजी घडली होती. साकिनाका पोलिसांनी याप्रकरणी पती सखाराम चौधरी (वय ४०) आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे. शंकर दांगी, अमरचंद गायरी आणि दिनेश गायरी अशी अटक केलेल्या अन्य आरोपींची नावे आहेत. सखारामने आपली पत्नी गीता चौधरी (वय ३५) हिच्या हत्येचा कट रचला आणि त्यानंतर तिला छताच्या पंख्याला लटकवून आत्महत्येचा बनाव रचल्याचा आरोप आहे.

Mumbai crime news
Honour killing | गुजरातमध्ये 'सैराट'चा थरार; वडील आणि भावाने केली प्रेमी युगुलाची हत्या

प्रेमसंबंधात अडसर! दुसऱ्या महिलेसोबत राहण्यासाठी रचला कट

सखाराम हा चांदिवलीतील संघर्ष नगर परिसरात पत्नी, दोन मुले (वय १२ आणि ५ वर्ष) आणि आई-वडिलांसोबत राहत होता तो हार्डवेअर दुकान चालवतो. त्याचे दुसऱ्या एका महिलेशी प्रेमसंबंध होते आणि त्याला तिच्यासोबत राहायचे होते. यासाठी त्याने आपली पत्नी गीता (वय ३५) हिचा काटा काढण्याचे ठरवले. २०२४ च्या सुरुवातीपासूनच त्याने हत्येचे नियोजन सुरू केले होते. यासाठी त्याने आपला मित्र शंकर दांगी याला ६ लाख रुपयांची सुपारी दिली होती. सखारामने ऑगस्ट २०२४ मध्ये त्याच भागात दुसऱ्या एका इमारतीत फ्लॅट भाड्याने घेतला आणि तिथे तो पत्नी व मुलांसह राहू लागला.

तीन वेळा अपयश, चौथ्यांदा यश

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पत्नीला मारण्याचे यापूर्वी तीन प्रयत्न झाले होते.

  • पहिला प्रयत्न: आरे कॉलनी परिसरात रात्री जेवण करून परतताना जड वस्तूने डोक्यात प्रहार करण्याचा बेत होता, पण तिथे लोकांची वर्दळ असल्याने तो फसला.

  • दुसरा प्रयत्न: अपघाताचा बनाव करून गाडीखाली चिरडण्याचा विचार होता, पण गीता मुलाला शाळेत ने-आण करताना नेहमी फुटपाथचा वापर करायची, त्यामुळे हा प्रयत्नही फसला.

  • तिसरा प्रयत्न: धावत्या ट्रेनमधून तिला ढकलून देण्याचा प्रयत्न झाला, मात्र तोही यशस्वी होऊ शकला नाही.

खून करून आत्महत्येचा बनाव

शेवटी १४ ऑक्टोबर २०२४ रोजी, जेव्हा मुले शाळेत होती आणि गीता घरी एकटी होती, तेव्हा शेवटचा प्लॅन बनवला. तीन आरोपींनी घरात घुसून तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर सखाराम तिथे पोहोचला आणि त्यांनी मृतदेह किचनमधील पंख्याला लटकवला, जेणेकरून ती आत्महत्या वाटेल. दुपारी जेव्हा मोठा मुलगा ट्यूशनवरून घरी आला, तेव्हा दरवाजा बंद होता. त्याने वडिलांना फोन केला, सखारामने येऊन दरवाजा उघडला आणि पत्नीने आत्महत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली होती.

संशय, गीताच्या वडिलांची कोर्टात लढाई आणि उलगडा

अंत्यसंस्कारानंतर गीताचे वडील भानाराम चौधरी यांनी राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील राणी पोलीस ठाण्यात संशयावरून तक्रार दिली. १८ ऑक्टोबर २०२४ रोजी तिथे हत्येचा गुन्हा दाखल झाला आणि नंतर तो साकिनाका पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

अंबरनाथमध्ये राहणाऱ्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मृतदेह बाहेर काढून पुन्हा तपासणी करण्याची मागणी केली. कोर्टाच्या आदेशानुसार ८ जानेवारी २०२५ रोजी मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि वैद्यकीय पथकाने त्याची तपासणी केली.

'त्या' एका पुराव्याने सखारामचे पितळ उघडे

राजावाडी रुग्णालयाचा सुरुवातीचा अहवाल 'फाशीमुळे मृत्यू' असा होता, परंतु जे.जे. रुग्णालयातील तज्ज्ञांनी केलेल्या पुनरावलोकनात धक्कादायक माहिती समोर आली. मृतदेहाच्या गळ्यावर फासाच्या दोन वेगवेगळ्या खुणा आढळल्या, ज्या सामान्यतः आत्महत्येच्या घटनेत नसतात. यातील एक खूण गळा आवळल्याची होती, तर दुसरी फासाची होती. या खुणांची लांबी, रुंदी आणि दिशा वेगवेगळी होती. या एका पुराव्याने सखारामचे पितळ उघडे पडले. ज्यावरून गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेह लटकवण्यात आल्याचा संशय बळावला.

पोलिसी खाक्या दाखवताच कबुली

फॉरेन्सिक अहवालानंतर साकिनाका पोलिसांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सखारामची चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबुल केला. त्याने सुपारीचे ६ लाख रुपये रोख आणि ७० हजार रुपये 'गुगल पे' द्वारे दिल्याचेही समोर आले आहे. सध्या चारही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.

Mumbai crime news
Pune News: भेटायला ये... प्रेयसीने मेसेज करून बोलावून घेतलं अन् तिच्या घरच्यांनी टेरेसवर नेऊन संपवलं; पुणे हादरले!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news