

मुंबई: राज्य सरकारच्या येथील मानव दूध बँकेने गेल्या तीन वर्षांत तब्बल १,२०० लिटर स्तनदूध संकलित व प्रक्रिया करून ७ हजारांहून अधिक नवजात बालकांना सुरक्षित दात्री स्तनदूध उपलब्ध करून दिले आहे. विशेषतः अकाली जन्मलेली आणि नवजात अतिदक्षता विभागात (NICU) उपचार घेत असलेल्या बाळांसाठी ही सेवा मोठा आधार ठरत आहे.
रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले की, "आईचे दूध हे नवजात बाळासाठी सर्वोत्तम पोषण आहे. विशेषतः अकाली जन्मलेल्या आणि अतिदक्षता विभागातील बाळांसाठी दात्री स्तनदूध अत्यंत महत्त्वाचे ठरते. या दूध बँकेमुळे बालकांचे आरोग्य सुधारण्याबरोबरच फॉर्म्युला दूध खरेदीवरील सरकारी खर्चातही बचत होत आहे."
रुग्णालयाच्या माहितीनुसार, दात्री स्तनदुधामुळे नवजातांमधील संसर्गाचा धोका कमी होतो, वजन वाढण्यास मदत होते आणि गंभीर अवस्थेतील बालकांचा मृत्यूदर कमी करण्यास हातभार लागतो. दूध संकलनापूर्वी दात्री मातांची तपासणी, दुधाचे पाश्चरायझेशन आणि सुरक्षित साठवणूक अशा सर्व प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडल्या जातात.
ही दूध बँक मेट्रन निरुपमा डोंगरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे आणि अधिष्ठाता डॉ. जितेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे.रुग्णालय प्रशासनाने स्तनपान करणाऱ्या मातांना अतिरिक्त दूध मानव दूध बँकेत दान करण्याचे आवाहन केले असून, त्यामुळे अधिकाधिक गरजू नवजात बालकांना जीवनदायी स्तनदूध उपलब्ध होऊ शकणार असल्याचे सांगितले.
तीन वर्षांतील कामगिरी
२०२३ : २७३.०७० लिटर दूध संकलन, २६३.२७५ लिटर वापर, ४,८२० मातांनी दूधदान, १,४५५ बालकांना लाभ.
२०२४: ४१५.६६१ लिटर दूध संकलन, ४०७.५४५ लिटर वापर, २,१८५ मातांनी दूधदान, २,३५८ बालकांना लाभ.
२०२५: ५२०.९१८ लिटर दूध संकलन, ४९४.०७४ लिटर वापर, १,६४६ मातांनी दूधदान, ३,१३३ बालकांना लाभ