

मुंबई: मुंबईत पावसाचा जोर कायम असल्याने डासजन्य आणि जलजन्य आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. जूनच्या तुलनेत जुलै महिन्यात मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, कोविड एच१एन१ (स्वाइन फ्लू) रुग्णसंख्येत दुप्पटीने वाढ झाली असून नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.
महापालिकेच्या आकडेवारीनुसार जूनमध्ये ६५५ असलेले मलेरियाचे रुग्ण जुलैमध्ये १,३८० वर पोहोचले आहेत. डेंग्यूचे रुग्ण २६६ वरून ४६६, लेप्टोस्पायरोसिसचे ३३ वरून ७८, गॅस्ट्रोचे ६०३ वरून ८५१, कोविड-१९चे २७ वरून ५८, तर एच१एन१चे ५८ वरून १०५ इतके वाढले आहेत. चिकुनगुनियाचे रुग्ण मात्र ७ वर स्थिर राहिले आहेत.
जुलै महिन्यात महापालिकेने ६ लाख ५९ हजारांहून अधिक घरांचे सर्वेक्षण केले. २३ लाखांपेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. ७५ हजार ६५० रक्तनमुने तपासण्यात आले, १२३ आरोग्य शिबिरे घेण्यात आली, तर ५१ हजार २१६ नागरिकांना लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंधात्मक औषधे देण्यात आली.
मलेरिया नियंत्रणासाठी ५४ हजार ६०५ संभाव्य उत्पत्तीस्थळांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ५,९६९ ठिकाणी अनोफिलीस डासांची उत्पत्ती आढळली. डेंग्यूसाठी १० लाख ९१ हजार ३१५ संभाव्य ठिकाणांची तपासणी करण्यात आली असून २१ हजार ९२४ ठिकाणी एडिस डासांची उत्पत्ती आढळली. या मोहिमेत २,५३५ जुने टायर आणि ६४ हजार ५९६ भंगार वस्तू हटविण्यात आल्या.
महापालिकेने नागरिकांना घरात किंवा परिसरात पाणी साचू न देणे, मच्छरदाणी किंवा रिपेलंटचा वापर करणे, उघड्यावरचे अन्न टाळणे, उकळलेले पाणी पिणे तसेच ताप किंवा अन्य लक्षणे आढळल्यास तातडीने महापालिकेच्या आरोग्य केंद्रात उपचार घेण्याचे आवाहन केले आहे. विविध विभागांमध्ये मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस आणि गॅस्ट्रोची रुग्णसंख्या वाढत असल्याने विशेष खबरदारी घेण्यासही सांगण्यात आले आहे.