

मुंबई: स्वयंपाक बनवण्यासाठी कामावर ठेवलेल्या मोलकरणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. याचिकाकर्त्या आरोपी नंदकुमार पणिकर याच्याविरोधातील गुन्हा रद्द करण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. पणिकरने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४८२ अंतर्गत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
पीडित महिला कांदिवली येथील एका सोसायटीत आरोपीच्या घरी स्वयंपाकाचे काम करत होती. तिच्या तक्रारीनुसार, मार्च २०१९ मध्ये महिला किचनमध्ये भांडी घासत असताना आरोपीने पाठीमागून येऊन तिचा विनयभंग केला.
याप्रकरणी समता नगर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्याची विनंती करीत आरोपी पणिकरने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
तक्रारदाराने २१ दिवसांच्या विलंबाने एफआयआर दाखल केला असून हा केवळ पैसे उकळण्याचा प्रयत्न आहे, असा दावा आरोपीच्या वकिलांनी केला होता. तसेच सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज आणि पीडितेचा कलम १६४(५A) अंतर्गत जबाब न नोंदवणे यावरून हा गुन्हा खोटा असल्याचा युक्तीवाद आरोपीतर्फे करण्यात आला होता.
तथापि, न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या एकलपीठाने आरोपीचा युक्तीवाद धुडकावत गुन्हा रद्द करण्यास स्पष्ट नकार दिला.
भारतासारख्या पारंपरिक समाजात महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये सामाजिक प्रतिष्ठा आणि भीतीपोटी तक्रार करण्यास वेळ लागू शकतो, असे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले आणि गुन्हा रद्द करण्यास स्पष्ट नकार देत आरोपीला जोरदार झटका दिला.