

मुंबई: दहावीच्या निकालात गुणांचे प्रमाण घटल्यामुळे अकरावीच्या प्रवेशासाठीच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत कटऑफ खाली येईल, अशी आशा बाळगून बसलेल्या हजारो विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा निराशेचा सामना करावा लागला आहे.
उलट मुंबईतील काही नामांकित महाविद्यालयांनी दुसऱ्या यादीतही आपली 'क्रेझ' कायम राखत कटऑफ वाढला आहे. नामांकित महाविद्यालयांतील जागांसाठीची स्पर्धा अजूनही तीव्र असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अकरावीच्या पहिल्या फेरीनंतर अनेक विद्यार्थ्यांनी अधिक चांगल्या महाविद्यालयाच्या प्रतीक्षेत प्रवेश निश्चित केला नव्हता. त्यामुळे दुसऱ्या यादीत जागा उपलब्ध होतील आणि कटऑफ कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता.
मात्र प्रत्यक्षात चित्र उलटे झाले आहे. एच. आर. कॉलेजच्या वाणिज्य शाखेचा कटऑफ ९३ टक्क्यांवरून ९३.२ टक्क्यांवर पोहोचला. आर. ए. पोदार कॉलेजचा कटऑफ ९४.२ वरून ९४.४ टक्के झाला, तर वझे-केळकर कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेचा कटऑफ तब्बल एक टक्का वाढून ९२.४ वरून ९३.४ टक्क्यांपर्यंत गेला असल्याने पहिल्या यादीत प्रवेश न घेता थांबलेल्या विद्यार्थ्यांना या यादीने धक्का दिला आहे.
मुंबई विभागता दुसऱ्या फेरीसाठी १ लाख ४६ हजार ८२७ विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यापैकी ७१ हजार ८९ विद्यार्थ्यांना या यादीत प्रवेश मिळाले आहेत. हे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना दोन दिवसात महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावे लागणार आहेत. या यादीत विशेष म्हणजे २९ हजार ५६९ विद्यार्थ्यांना पहिली पसंती, १२ हजार ७४ विद्यार्थ्यांना दुसरी पसंती आणि ८ हजार ६०३ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.
वाणिज्य शाखेतील स्पर्धा सर्वाधिक तीव्र असून या फेरीत ७१ हजार ८९ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ३९ हजार १८७ विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेत प्रवेश मिळाला. विज्ञान शाखेत २४ हजार ४१८ तर कला शाखेत केवळ ७ हजार ४८४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.
नामांकित महाविद्यालयांच्या कटऑफकडे पाहिले असता एचआर, एनएम, पोदार, रुईया, सेंट झेविअर्स, वझे-केळकर, मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स, डहाणूकर या महाविद्यालयांमध्ये ९० टक्क्यांच्या पुढील स्पर्धा कायम आहे. एन. एम. कॉलेजचा वाणिज्य कटऑफ ९३.४ टक्के, पोदारचा ९४.४ टक्के, एचआरचा ९३.२ टक्के आणि मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्सचा ९२.२ टक्के असल्याने ९०प्लस विद्यार्थ्यांचेच या महाविद्यालयांवर वर्चस्व कायम आहे.
कला शाखेत काही प्रमाणात घसरण दिसून आली असली तरी त जय हिंद कॉलेजचा कटऑफ ८९ वरून ८८.८ टक्के, रुईयाचा ९१.८ वरून ९१.४ टक्के आणि वझे-केळकरचा ८९.४ वरून ८९.२ टक्के झाला आहे. उलट भवन्स कॉलेजमध्ये कला शाखेचा कटऑफ ८४.४ वरून ८४.६ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
विज्ञान शाखेतही स्थिती फारशी वेगळी नाही. फादर अॅग्नेल कॉलेजचा विज्ञान कटऑफ ९३.२ टक्के, रुईयाचा ९३ टक्के, वझे-केळकरचा ९२.२ टक्के, बांदोडकरचा ९१.६ टक्के आणि सेंट झेविअर्सचा ९१.६ टक्के आहे. त्यामुळे विज्ञान शाखेसाठी ९० प्लस टक्क्यांच्या पुढे नामांकित महाविद्यालयात वर्चस्व दिसून आले आहे.
पहिल्या फेरीत १ लाख ३३ हजार ३२३ विद्यार्थ्यांना प्रवेश
मिळाले होते. मात्र त्यापैकी केवळ ७६ हजार २१४ विद्यार्थ्यांनी प्रवेश महाविद्यालयांत जाऊन निश्चित केला. तरीही दुसऱ्या यादीत कटऑफमध्ये मोठी घसरण झाली नाही. विद्यार्थी अजूनही पर्याय खुले ठेवत असल्याचे आणि प्रतिष्ठित महाविद्यालयांतील प्रत्येक जागेसाठी चुरस कायम असल्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी बोलताना सांगितले.
कटऑफचा आकडा काही महाविद्यालयांत खाली येण्याऐवजी वाढल्याने पुढच्या यादीत नक्की संधी मिळेल या आशेवर असलेल्या विद्यार्थ्यांना आता मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करण्याचा विचार करावा लागणार आहे.