पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री ममता कुलकर्णीला ड्रग्ज प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तिच्या विरोधातील ड्रग्ज प्रकरणातील दोषारोप रद्द केले आहेत. २०१६मध्ये ममता कुलकर्णी विरोधात ड्रग्ज प्रकरणात ठाण्यातील वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. Mamta Kulkarni Drugs Case
ममता कुलकर्णीवर Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1985 (NDPS Act) नुसार गुन्हा नोंद झाला होता. सोलापुरातील अॅव्हान लाईप सायन्स या कंपनीतून केनयाला इफिड्रेनची पावडर स्मगलिंग करण्याशीसंबंधित हा गुन्हा होता, असे बार अँड बेंचने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.
केनयातील एका हॉटेलमध्ये या तस्करीचा कट रचण्यात आला आणि मीटिंगसाठी ममता कुलकर्णी उपस्थितीत होती, असे दोषारोप पत्रात म्हटले होते. ममता कुलकर्णी विकी गोस्वामी आणि मनोज जैन या दोषींसोबत मीटिंगला हजर होती, असा तिच्यावर आरोप होता. या प्रकरणात नंतर बऱ्याच जणांना अटक झाली, तसेच एक किलो इफिड्रेन पावडर जप्त करण्यात आली. यामध्ये पुरवणी दोषारोप दाखल करून ममता कुलकर्णी हिलाही आरोपी बनवण्यात आले.
या प्रकरणी बुधवारी सुनावणी झाली. न्यायमूर्ती भारती डंग्रे आणि मंजुषा देशपांडे यांनी ममता कुलकर्णी विरोधातील आरोपपत्र रद्द केले. न्यायमूर्ती म्हणाले, "फक्त मीटिंगला हजेरी होती या एका कारणामुळे NDPS कायद्यानुसार दोषारोप सिद्ध होत नाहीत."
शिवाय या प्रकरणात मीटिंगहा हजर होती, हा एकमेव मुद्दा वगळता तिचा या प्रकरणात काय संबंध आहे हे स्पष्ट करण्यात आलेले नाही, असे ममता कुलकर्णीच्या वकिलांनी न्यायालयात मांडले.