

Mumbai Red Alert Heavy Rainfall
मुंबई : सोमवारी पहाटेपासून मुंबई आणि महानगर क्षेत्रात जोरदार पावसाने हजेरी लावली असून पावसामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशीच रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. दादर स्टेशन परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली असून मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेवरील लोकल ट्रेनची वाहतूक 10 मिनिटे उशिराने सुरू आहे. तर पश्चिम द्रुतगती मार्गावरही वाहतूक कोंडी झाली असून अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
सांताक्रूझ वेधशाळेने सोमवारी पहाटेपासून ८५ मिमी पावसाची नोंद केली आहे. तर कुलाबा येथे ५५ मिमी पाऊस पडला आहे. शहराच्या स्वयंचलित हवामान केंद्रांच्या (AWS) माहितीनुसार या परिसरात हवामानात तीव्र बदल दिसून आला आहे. दक्षिण मुंबईत, फोर्टमध्ये १३४ मिमी, कॉटन ग्रीनमध्ये १४५ मिमी, ग्रँट रोडमध्ये १२१ मिमी आणि लोअर परेलमध्ये १२९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
महामार्गांवरील वाहतूकही मंदावली
मुंबईत पावसामुळे महामार्गांवरही वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. मुंबई पूर्व द्रुतगती महामार्ग आणि ईस्टर्न फ्री वे या दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी प्रचंड प्रमाणात झाली आहे.
बाईक रॅली रद्द
मुंबईत पावसाचा जोर वाढल्याने आणि सकाळपासून सर्वत्र वाहतूक कोंडी झाल्यामुळे मुंबई विमानतळावरुन श्रीमंत राजे रघूजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार आणण्यासाठी काढण्यात येणारी बाईक रॅली रद्द करण्यात आली आहे. पण संध्याकाळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रम नियमित वेळेत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंबई- रायगडमध्ये पुढील तीन ते चार पावसाचेच
सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने मुंबई आणि रायगडमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील ३-४ तास मुंबईत देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
वांद्रे कुर्ला संकुलात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल
सोमवारी सकाळी कुर्ला व वांद्रे-कुर्ला संकुल येथे पावसामुळे कामावर जाणाऱ्यांती तारांबळ उडाली होती. रिक्षांची कमतरता असल्यामुळे प्रवाशांचा भरपावसात खोळंबा झाला होता.
अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद
अंधेरी सबवेला पाणी साचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक गोखले पूल आणि ठाकरे पूल या मार्गाकडे वळवण्यात आली आहे.
घोडबंदर रोडवरही वाहतूक कोंडी
घोडबंदर रोडवरही सोमवारी सकाळी ठाण्याच्या दिशेला येणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी झाली आहे. मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून काशिमिरा येथे वाहतूक कोंडी झाल्याची तक्रार प्रवाशांनी सोशल मीडिया प्लाटफॉर्मवर केली आहे.