

मुंबई : राज्यातील महायुती सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी तयारीला सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी महायुती म्हणून लढण्याची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी महायुती म्हणून लढायचे आणि जिथे महायुती म्हणून लढल्यास नुकसान होऊ शकते, तिथे स्वतंत्रपणे लढायचे, असे सूत्र महायुतीमधील घटक पक्षांनी ठरवल्याचे समजते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई महानगरपालिका भाजप शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) एकत्रित लढणार आहेत. विशेष म्हणजे एकत्र लढताना स्थानिक कार्यकर्ते दुखावले जाऊ नयेत, याची काळजी महायुतीमधील सर्व घटक पक्ष घेणार आहेत. त्यामुळे पुणे, पिंपरी - चिंचवड महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट असा महायुतीमधील पक्षाचा संघर्ष होऊ शकतो. सर्व ठिकाणी युती करण्याची भूमिका घेतल्यास कार्यकर्त्यांना लढण्यासाठी जागा मिळणार नाही त्यामुळे गेले काही वर्षे मेहनत केलेले आणि तयारी केलेले कार्यकर्ते ऐन वेळेवर विरोधी पक्षांमध्ये जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही, त्यामुळे महायुतीमधील नेते सावध भूमिका घेत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका दिवाळीनंतरच होणार असल्याचे समजते. त्यातही पहिल्या टप्प्यात सुरुवातीला पंचायत समिती, जिल्हा परिषदा, त्यानंतर दुसर्या टप्प्यात नगरपालिका, नगरपरिषदा आणि शेवटी तिसर्या टप्प्यात महानगरपालिकांच्या निवडणुका होणार असल्याचेही समजते.