

मुंबई: ग्रँट रोड स्थानकातील फलाट क्रमांक २ आणि ३ च्या एका पादचारी पुलाच्या जिन्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे कार्यालयीन वेळेत या फलाटांवर गर्दी होऊन प्रवाशांना इतर पुलांकडे धाव घ्यावी लागते.
गिरगाव चौपाटीकडे जाण्यासाठी हे स्थानक सोईचे असल्याने गणपती विसर्जन कालावधीत या स्थानकावर होणारी मोठी गर्दी पाहता येथे चेंगराचेंगरीची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून ५.३१ कोटी रूपये खर्च करून 'ग्रँट रोड' स्थानकाचा चेहरा मोहरा बदलला जात आहे. सध्या या स्थानकात चार प्लॅटफॉर्म असून तीन पादचारी पूल आहेत. साधारण दररोज ७७ हजार ३४५ प्रवासी येथून प्रवास करतात. सुट्टीच्या दिवशी आणि गणपती विसर्जन कालावधीत या स्थानकावर प्रचंड गर्दी होत असते.
अपुऱ्या कामामुळे प्रवाशांची गैरसोय
ग्रँट रोड स्थानकाच्या फलाट क्रमांक २ आणि ३ वर विरार- बोरिवली येथून येणाऱ्या धीम्या आणि चर्चगेट वरून धावणाऱ्या जलद गाड्यांच्या प्रवाशांची नेहमी गर्दी असते. येथील मधल्या पादचारी पुलाच्या जिन्याचे काम अजूनही पूर्ण न झाल्याने प्रवाशांना लांब अंतर कापून इतर पुलांचा आधार घ्यावा लागत आहे.
गर्दीमुळे दुर्घटनेची भीती
या स्थानकावरून गिरगाव चौपाटीवर जाण्यासाठी गणपती विसर्जन कालावधीत मोठ्या संख्येने मुंबईकर येथे येत असतात. अशात पुलाचा जिना बंद असल्याने प्रवाशांची इतर दोन लहान जिन्यावर गर्दी होऊन येथे विसर्जन काळात चेंगराचेंगरीची शक्यता निर्माण झाली आहे.