

High Court
मुंबई : आजी आणि नातवंडांचे भावनिक नाते असते. मात्र आजीला नातवाचा ताबा ठेवण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. न्या. रवींद्र घुगे आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने ७४ वर्षीय वृद्ध महिलेला तिच्या ताब्यात नातवाला ठेवण्यास स्पष्ट नकार देताना पाच वर्षांच्या नातवाचा ताबा त्याच्या पालकांना परत करण्याचे निर्देश दिले.
वृद्ध महिलेचा मालमत्तेवरून मुलाशी वाद सुरू झाला. त्या वादामध्ये मुलाने आईला नातवाचा ताबा सोडण्यास सांगितले. मात्र वृद्ध महिलेने नातवाचा ताबा सोडण्यास नकार दिल्यानंतर तिच्या मुलाने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. त्याच्या याचिकेवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने लहान मुलाच्या ताब्याबाबत त्याच्या आई-वडिलांच्या अधिकारावर भर दिला आणि वृद्ध महिलेला लहान नातवाचा ताबा त्याच्या पालकांकडे परत करण्यास सांगितले.
वृद्ध महिलेचे मुलाशी भावनिक नाते आहे. मात्र ते नाते वृद्ध महिलेला नातवाचा ताबा ठेवण्याबाबत वरचढ अधिकार देत नाही. मुलाच्या पालकांना त्याच्या जुळ्या भावाची काळजी घ्यावी लागत होती. तो सेरेब्रल पाल्सीने ग्रस्त आहे. त्यामुळे मुलाला आजीच्या ताब्यात सोपवले होते. मालमत्तेवरून वाद सुरू झाल्यानंतर मुलाच्या ताब्याचा प्रश्न निर्माण झाला. त्याच अनुषंगाने न्या. रवींद्र घुगे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.