

मुंबई : कांदिवली येथील गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात सहा जणांचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच गोरेगाव परिसरातील एका सात मजली निवासी इमारतीला बुधवारी पहाटे लागलेल्या आगीच्या धुरामुळे गुदमरून रमीला साहा (65) आणि कृणाल साहा (40) जखमी झाले. कोकिळाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
गोरेगाव येथील सिद्धार्थ नगरमधील अतुल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. या सात मजली इमारतीमध्ये पहाटे 3.53 वाजता आग लागल्याची नोंद झाली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये ही आग लागली होती. अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पहाटे 4.15 वाजेपर्यंत आग विझवली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.