

मुंबई ः पूर्वी कायदे शिक्षणाकडे पारंपरिक वकिली घराण्यांतील विद्यार्थ्यांचाच ओढा होता. मात्र बदलत्या काळात कायद्याबाबत जागरूक होत चाललेल्या तरुण पिढीमुळे विधी शिक्षण लोकप्रिय होत आहे. यावर्षी एलएलबी तीन वर्षे अभ्यासक्रमाकडे अधिक ओढा दिसून आला. परिणामी 23 हजार 859 जागांपैकी 22 हजार 917 जागांवर प्रवेश झाले आहेत.
यंदा या अभ्यासक्रमासाठी राज्यातील 218 महाविद्यालयांमध्ये असलेल्या 23 हजार 859 उपलब्ध जागांपैकी 22 हजार 917 जागांवरचे प्रवेश निश्चित झाले आहेत. रिक्त राहिलेल्या 942 जागांपैकी 860 जागा या ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी उपलब्ध असलेल्या कोट्यातील आहेत. तर कॅप फेर्यांसाठी उपलब्ध असलेल्या सर्वच्या सर्व 19 हजार 895 जागा कॅप फेर्यांद्वारेच भरल्या गेल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात विधी-3 वर्षे अभ्यासक्रम देऊ करणार्या महाविद्यालयांच्या संख्येत 51 ने वाढ झाली. गेल्या वर्षी 167 महाविद्यालयांमध्ये या अभ्यासक्रमासाठी 21 हजार 71 जागा होत्या. तर यंदा 218 महाविद्यालयांमध्ये 23 हजार 859 जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली.
यंदा उपलब्ध जागांपैकी 96.05 टक्के म्हणजेच 22 हजार 917 जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. यावर्षी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया अंतर्गत प्रवेश 100 टक्के, तर कॅप, ईडब्ल्यूएस व संस्थात्मक फेरी या तिन्ही जागा मिळून प्रवेशाची एकत्रित टक्केवारी ही 96 टक्के इतके प्रवेश झाले आहेत. संस्थात्मक फेरीसाठी उपलब्ध असलेल्या 2 हजार 205 जागांपैकी 99.95 टक्के म्हणजेच 2204 जागांवर प्रवेश निश्चित झाले. तर ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी उपलब्ध असलेल्या 1678 जागांपैकी 818 जागांवर प्रवेश झाले. या प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या 860 म्हणजेच जवळपास 51.25 टक्के जागा रिक्तच राहिल्या. विशेष म्हणजे यंदा अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी ईडब्ल्यूएस कोट्यातून उपलब्ध असलेल्या जागांपैकीही 50 टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत.