

मुंबई : एकाच मतदाराचे अनेक ठिकाणी नाव आहे, तर फोटोचा पत्ता नाही, एकाच घरात दोनशेहून अधिक असलेले मतदार, मराठी मतदाराचे नाव मल्ल्याळी भाषेत, मतदारांची यादीतून गायब झालेली नावे आदी गंभीर मुद्दे बुधवारी विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देत हा प्रकार संशयास्पद असल्याचा आरोप केला. त्यामुळे मतदार यादीतील दोष आधी निस्तरा; अन्यथा इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा, असा संताप व्यक्त करत मतदारयादीतील घोळ सुधारल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी व राज्य निवडणूक आयोगाला सुनावले. तसेच, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर दोन दिवसांत आम्ही आमची भूमिका ठरवू, असे विरोधकांनी स्पष्ट केले.
लोकशाहीच्या रक्षणासाठी निष्पक्ष निवडणुका पार पडाव्यात आणि निवडणूक यंत्रणेवरील विश्वास कायम राहावा, यासाठी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांसह मनसेच्या प्रमुख नेत्यांनी मंगळवारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली होती. चर्चेदरम्यान शिष्टमंडळाने चोक्कलिंगम यांच्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळू शकली नाहीत. त्यामुळे बुधवारी राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम, आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय शिष्टमंडळाची बैठक पार पडली.
त्यानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाची पत्रकार परिषद झाली. यावेळी शिवसेना ‘उबाठा’ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत, माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, मनसे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, शेतकरी नेते अजित नवले पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
जयंत पाटील यांनी मतदारयाद्यांतील त्रुटींची विविध ठोस उदाहरणे सादर केली. मुरबाडमध्ये 400 मतदारांच्या घरासमोर डॅश (-) आहे, बडनेरात आणि कामठी येथे घर क्रमांक शून्य, तर नालासोपाऱ्यात सुषमा गुप्ता यांचे नाव सहावेळा नोंदवले, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी दिली. सर्व पुरावे आयोगासमोर मांडल्यानंतर दुपारी नाव होते. परंतु, सायंकाळी ते गायब झाले. याचा अर्थ कुणीतरी बाहेरची व्यक्ती निवडणूक आयोगाचा सर्व्हर चालवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
...तर लोकशाहीला मोठा धोका : बाळासाहेब थोरात
निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदारयादीत झालेले घोळ याची तक्रार आम्ही करूनही त्यावर कारवाई झालेली नाही. देशपातळीवर राहुल गांधी यांनी हाच मुद्दा मांडला. तथापि, निवडणूक आयोग स्वतःवरील जबाबदारी झटकत आहे. त्यामुळे निष्पक्ष निवडणुका झाल्या नाहीत, तर तो लोकशाहीला मोठा धोका असल्याची टीका थोरात यांनी केली.
भाजप पदाधिकाऱ्याला निवडणुकीचे काम : विजय वडेट्टीवार यांचा आरोप
राजुरा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या नेत्याच्या मोबाईलवर ओटीपी आला. तो कसा? याबाबत आम्ही तक्रार करूनही कारवाई झालेली नाही. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटचे काम करणारा देवांग दवे हा भाजपचा पदाधिकारी आहे. त्याला कंत्राट कसे मिळाले होते, याबाबत निवडणूक आयोगाने अद्याप खुलासा केलेला नाही, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
मतदार याद्यांत घोळ असेल, तर निवडणुका घेताच कशाला? : उद्धव ठाकरे
लोकशाहीसाठी आणि त्याच्या रक्षणासाठी सर्व पक्ष एकत्र आले आहेत. मात्र, आयोगाशी बोलताना लक्षात आले की, ते निवडणूक अधिकारी नव्हेत, तर कठपुतळी बाहुल्या आहेत. त्यांना वरून कोणीतरी आदेश देते आणि हे काम करतात. त्यामुळे आम्हाला आमच्या मुद्द्यांवर योग्य उत्तरे मिळाली नाहीत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. लोकशाहीच्या नावाने आयोग हुकूमशाही गाजवत असेल, तर गाजवू देणार नाही. मतदारयाद्यांमध्ये घोळ असेल, तर निवडणुका घेताच कशाला, असा खडा सवाल करत त्यांनी निवडणूकआयोगाला फैलावर घेतले.
मतदार याद्या गोपनीय कशा असू शकतात? : राज ठाकरे
केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाच्या दोन्ही प्रतिनिधींची सलग दोन दिवस भेट घेतल्यानंतरही चर्चेतून काहीही निष्पन्न झाले नाही, असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदारांची नावे वाचून दाखवली. या मतदार यादीमध्ये वडिलांपेक्षा मुलाचे वय जास्त दाखवण्यात आल्याने कोण कोणाचे वडील हा प्रश्न पडतो. त्यामुळे मतदारयाद्यांमधील हा घोळ आधी दुरुस्त करा आणि त्यानंतर निवडणुका घ्या, अशी मागणी त्यांनी केली. ते म्हणाले की, निवडणुका राजकीय पक्ष आणि मतदान करणारे मतदार यांच्याशिवाय होऊ शकत नाही. निवडणूक आयोग फक्त निवडणुका घेतात. राजकीय पक्ष निवडणुका लढवतात. मात्र, निवडणूक आयोग राजकीय पक्षांना आणि मतदारांना मतदार याद्याच दाखवत नसेल, तर घोळ तिथेच आहे, असा आरोप करत मतदान गोपनीय असते; पण मतदार यादी गोपनीय कशी असू शकते, असा थेट सवाल करत राज ठाकरे यांनी आयोगावर घणाघात केला.