

मुंबई : राज्यातील दूध भेसळीच्या वाढत्या प्रकारांवर आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक झाले असून, "शेतकरी कधीच दुधात भेसळ करत नाहीत, ही भेसळ डेअरी चालकांकडूनच होत आहे," असा थेट आरोप त्यांनी केला. दरम्यान विधिमंडळ परिसरात पडळकर यांनी आज (दि.११) दूध भेसळीचे थेट प्रात्यक्षिकच दाखवले.
पडळकरांनी पत्रकार परिषदेत दुधात भेसळ कशी केली जाते याचे प्रात्यक्षिक सादर करत धक्कादायक माहिती उघड केली. ते म्हणाले, "राज्यात म्हशीचे शुद्ध दूध मिळत असताना, मोठ्या प्रमाणात भेसळ करून बनावट दूध तयार केलं जातं. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये याचे प्रमाण गंभीर आहे."
भेसळीविरोधी कायदा कठोर करावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले. "इस्लामपूर येथे एका डेअरीत भेसळ होत असल्याचे स्पष्ट झाले असून, संबंधितांवर कारवाई झालीच पाहिजे. काही राजकीय लोकांच्या छत्रछायेखाली हे उद्योग चालतात," असा थेट आरोपही आमदार पडळकर यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, "जर अशी भेसळ सुरुच राहिली, तर शेतकऱ्यांना त्यांच्या शुद्ध दूधाचा योग्य भाव कसा मिळणार? सरकारने चांगल्या दूध संघांना प्रोत्साहन द्यावं, आणि त्यांच्या दुधाला प्राधान्य द्यावं."
धर्मांतराच्या मुद्द्यावरही स्पष्ट भूमिका मांडताना पडळकर म्हणाले, "मी ख्रिश्चन समाजाबद्दल काहीही चुकीचं बोललो नाही. कालच्या कार्यक्रमात मी फक्त धर्मांतर प्रकरणावर भाष्य केलं. काही लोकांनी आमिष दाखवून धर्मांतर घडवलं आहे आणि मोठ्या प्रमाणात लोक कन्व्हर्ट झाले आहेत.
दूधाच्या माध्यमातून विष घातले जात असेल तर हे गंभीर आहे. आमदार गोपीचंद पडळकरांनी या अतिशय गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधले आहे. मी स्वत: संबंधित विभागांची बैठक घेऊन कडक कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.