

मुंबई: महापालिका कंत्राटदाराच्या चुकीमुळे गिरगावात जलवाहिनी फुटून शुक्रवारी लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया गेल्यामुळे गिरगावच्या रस्त्याला स्विमिंग पूलचे स्वरूप आले होते. जलवाहिनी फोडून कंत्राटदार पसार झाल्याने गिरगावातील अनेक वाड्या-गल्ल्यांमध्ये पाणी भरले होते. या घटनेमुळे अनेक रहिवाशांना मात्र पाण्यापासून वंचित रहावे लागले.
गिरगावातील जगन्नाथ शंकर शेठ रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून धीम्या गतीने सुरू आहे.
याच रस्त्याला लागून असलेल्या गिरगाव मेट्रो स्थानकाजवळ शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास महापालिकेचा कंत्राटदार जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करत असताना त्याच्या चुकीमुळे जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्यामुळे गिरगावातल्या, क्रांतीनगर, मुगभाट लेन आणि इतर काही वाड्या आणि गल्ल्यांमधील रहिवाशांना ऐन उन्हाळ्यात पाण्यापासून वंचित रहावे लागले. कंत्राटदार मात्र पालिकेला कळवायचे सोडून तेथून पसार झाला. त्यामुळे जवळजवळ पाऊण तास पिण्याचे पाणी अक्षरशः वाया गेले.
गिरगावकरांचे पाण्यावाचून हाल
पाण्याच्या कमतरतेमुळे गिरगावात राहणे आता खूपच कठीण झाले आहे. पूर्वी घरातील नळाला तास-दीड तास येणारे पाणी आता पाऊण तासांवर आले आहे. पाण्याचा प्रवाह पूर्वीपेक्षा फारच कमी झाला आहे. पहाटे जराशी डुलकी लागलीच, तर पाणी आले कधी आणि गेले कधी हे सुद्धा अनेक वेळा गृहिणींना समजत नाही.
पण अन्य विभागांत मात्र दिवसातून 2 ते 3 वेळा पाणीपुरवठा केला जात असताना गिरगावकरांना पाणी देताना मात्र भेदभाव का, असा प्रश्न नागरिकांनी पालिकेला विचारला आहे. या घटनेवरून आता मनसे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.