

घाटकोपर : मुंबई पूर्व उपनगराला पश्चिम उपनगराशी आणि विमानतळाशी जोडणारा घाटकोपर -अंधेरी लिंक रस्ता हा मुंबईचा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे. मात्र या रस्त्यावर घाटकोपरच्या श्रेयस सिग्नलजवळ गेले अनेक महिने रस्त्यावरून गटारे वाहत असल्याने रस्ता गटारमय झाला आहे.
याबाबत वारंवार तक्रार करूनही महापालिकेने ठोस उपाययोजना न केल्याने अखेर घाटकोपरवासियांनी या रस्त्याचे नावच आता बदलून घाटकोपर अंधेरी गटार रस्ता असे करण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे. घाटकोपर प्रगती मंचतर्फे दि. 8 रोजी महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन रविवारी या रस्त्याचे नामकरण करण्यात येणार असून हे नाव अधिकृत करण्याबाबत महापालिकेला पत्रच दिले आहे.
या महत्वाच्या रस्त्यावर श्रेयस सिग्नल आधी मोकळा भूखंड रस्त्याला लागून आहे. येथे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने येथे डेब्रेज व कचऱ्याचे ढीग होऊन रस्त्यापर्यंत हा कचरा पसरतो. त्यातच या रस्त्याला लागून असलेले गटार गेले अनेक महिने थेट रस्त्यावरून वाहून दोन्ही बाजूने हे घाणेरडे पाणी दोनशे मीटरपर्यंत पसरते. हे घाण पाणी नागरिकांच्या अंगावर सर्रास उडते, अनेक दुचाकी यावर स्लिप होऊन अपघात होतात.
अतिशय गलिच्छ असा भाग येथे निर्माण झाला आहे. याबाबत घाटकोपरवासियांनी महापालिकेकडे तक्रारी केल्या. सोशल मीडियावर येथील फोटो व्हिडिओ व्हायरल होत असतानाही महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. येथे जेव्हा काही राजकीय कार्यक्रम होतात तेव्हा मात्र हा परिसर तत्काळ स्वच्छ होतो, गटारे बंद होतात. पण इतरवेळी येथे प्रचंड अस्वच्छता असते.
याला कारणीभूत महापालिकेप्रमाणेच लोकप्रतिनिधीही आहेत. यामुळे आम्ही दोघांचे डोळे उघडण्यासाठी अनोखा नामकरण सोहळा आयोजित केला आहे. 12 रोजी सकाळी आम्ही महापालिकेच्या सर्व अधिकारी व सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रण पत्रिका पाठवणार आहे. या घाटकोपर अंधेरी लिंक रस्त्याचे या ठिकाणी नामकरण घाटकोपर अंधेरी गटार रस्ता करण्यात येईल. तसेच याच्या फलकाचे अनावरणही करण्यात येईल. यामुळे तरी महापालिकेला जाग येईल अशी आशा असल्याचे घाटकोपर प्रगती मंचचे सदस्य म्हणाले. त्यामुळे आता महापालिका याबाबत काय पाऊल उचलते याकडे संपूर्ण घाटकोपरवासियांचे लक्ष लागले आहे.