Mumbai pune express way | बहुपर्यायी वाहतूक व्यवस्थेची गरज

Mumbai pune express way |
Mumbai pune express way | बहुपर्यायी वाहतूक व्यवस्थेची गरज
Published on
Updated on

ए. व्ही. कोळी

वाहतूक कोंडी, अपघात किंवा नैसर्गिक आपत्ती यांसारख्या परिस्थितीत केवळ एकाच वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून राहणे अपुरे ठरते. रेल्वे, रस्ता, विमान आणि जलवाहतूक यांचा समन्वय साधणारे मल्टी मोडल ट्रान्सपोर्टद्वारे घाटमार्ग, शहरातील कोंडी आणि आपत्कालीन परिस्थितीतील प्रवास अधिक सुकर होऊ शकतो.

मल्टी मोडल (बहुविध, बहुपर्यायी) वाहतूक शास्त्र म्हणजे रेल्वे, रस्ता, हवाई मार्ग आणि जल वाहतुकीत एकमेकांशी समन्वय करून एकमेकांना ट्रान्सफर देऊन वाहतूक करणे. विमान वाहतूक व्यवसायात इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (आयएटीए)चे मूळ शास्त्र व जहाजांचे एफसीएल आणि एलसीएल शास्त्र वापरले जाते. म्हणजे फुल्ल कंटेनर लोड आणि लूज कंटेनर लोड. या शास्त्रानुसार विमानतळावर सुरक्षिततेसाठी व प्रवासी टर्मिनल व कार्गो वेअर हाऊस ऑफिसेसपासून दूरवर असा रिमोट बे बांधला जातो व तो फायर फायटिंग यंत्रणेला सोयीस्कर अंतरावर असतो. एखाद्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा संदेश मिळतो तेव्हा विमान तेथे नेऊन पूर्ण सुरक्षा तपासणी केली जाते. भारतातही असा वापर व्हायला हवा.

डोंगरावर जेसीबी, बुलडोझर, क्रेन, ट्रॅक्टर, टँकर वा इतर अवजड सामान चढविण्यासाठी विशेष विमाने आहेत. अशा विमानाने घाटात उलटलेला टँकर अलगद उचलून हव्या त्या सपाट जागेवर अथवा कुठेही ठेवला जाणे हा पहिला उपाय. म्हणजे मेसेज मिळाल्यापासून 30 ते 40 मिनिटांत अशा विमानाद्वारे टँकर उचलून रस्ता रिकामा केला असता तर नुकतेच मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर जी 31 तास वाहतूक ठप्प झाली होती तशी झाली नसती. एका तासात वाहतूक सुरळीत झाली असती. इथून पुढे तरी ही व्यवस्था करायलाच हवी. फक्त घाटातच नव्हे तर वाहतूक ठप्प होणार्‍या सर्व ठिकाणासाठी ही सोय होईल. मल्टी मोडल शास्त्राचा अत्यावश्यक गरजेचा उपाय म्हणजे वाहतूक कोंडी किंवा अनेक किलोमीटरची रांग तयार होते, तिथे हा उपाय चांगला ठरतो.

मुंबई, पुणे घाट पार करताना रस्ते बनवण्यावर मर्यादा येतात. त्यावर उपाय म्हणून खोपोली, कर्जत ते लोणावळा घाटात रेल्वे आणि रस्त्याचा समन्वय घालणे होय. रोरो ट्रान्सफर करणे हा उपाय होऊ शकतो. खोपोलीत रेल्वेपासून हायवेपर्यंत रस्त्यावरची वाहने रेल्वेवर घेणे व रोरो रेल्वे खोपोली, कर्जत-लोणावळा व त्यापुढे आणून वाहने रोडवर सोडावीत. तसेच पनवेल मुंबई ठाणे ट्रॅफिक जाममुळे वाहतूक ठप्प होते. अशा वेळी पनवेल रेल्वेवर रोरो वाहने लोड करून मुंबईकडे दिवा-वसई, पनवेल-मुंबई व पनवेल-कोकण रेल्वे - कर्जत रेल्वेवर रोरो वाहने वाहतूक करणे आवश्यक आहे.

रोरोने एका रेल्वेवर सरासरी शंभर वाहने रोडवरून कमी झाल्यास ठप्प होणारी समस्या दूर होऊ शकेल. गरज पडल्यास एका पाठोपाठ एक रोरो सोडल्यास समस्येवर कायमचा उपाय होईल. तसेच गुजरातकडून येणारी व कोकणकडे व पुण्याकडे जाणारी वाहने यांना रस्त्याऐवजी रेल्वे वसई ते पनवेल ते वसई सतत सोडल्यास या टप्प्यातील रस्ते वाहतूक समस्या दूर होईल. सध्या घोडबंदर ते ठाणे ते पनवेल रस्त्यावरची वाहतूक कायम तुंबलेली असते. रोडवरून रेल्वेवर येणे म्हणजे रस्ता रिकामा होणे. अशी दररोज हजारो वाहने एकमेकांना अडथळा करतात. त्यावर रेल्वे रोरोचा टप्पा शहरी गर्दी व घाट पार करताना कायमचा उपाय ठरू शकतो. बोगदे, रस्ते बांधणे यासाठी दशको वर्षे लागतात. त्यावर ताबडतोबीचा उपाय म्हणजे रोरो रेल मल्टी मोडल वापरणे होय.

रेल्वे आणि रस्ते यात समन्वय असला पाहिजे. आमची जागा - तुमची जागा, आमची अडचण आम्हीच सोडवू, तुमची मदत घेत नाही, असा पवित्रा योग्य नाही. सर्व जागा मल्टी मोडलसाठी, ही रेल्वेची - ती रस्त्याची अशी वेगवेगळी न ठेवता समन्वय घालून योग्य वापर करण्याची अशी मानसिकता झाली पाहिजे. शास्त्राविरुद्ध निर्णय घेऊन पहाडाएवढे प्रश्न रेल्वेने निर्माण केलेत. त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे भायखळा ते शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान रेल्वेचे काम करायचे होते तर अगदी तामिळनाडू, कर्नाटक व कोल्हापूर-मिरजहून येणार्‍या जाणार्‍या रेल्वेगाड्या कॅन्सल केल्या. 500 ते 1000 किमीवरून हजारो प्रवासी घेऊन येणार्‍या-जाणार्‍या रोज डझनभर गाड्या कॅन्सल. कारण काय तर शिवाजी महाराज टर्मिनसला त्या पोहोचू शकत नाहीत. खरे तर त्या गाड्या दादर, ठाणे, वसई, पनवेलपर्यंत आल्या असत्या तर लोकल रेल्वे व रस्त्याने प्रवासी पोहचले असते. गरज होती मुंबईत पोहोचायची.

एकदा लोणावळा ते कर्जत दरम्यान खंडाळा घाटात काम चालू होते. त्यावेळी तामिळनाडू, कर्नाटक, मिरज-कोल्हापूरहून येणार्‍या गाड्या लोणावळ्यापर्यंत आणणे व तेथून बसने घाट उतरून खोपोली रेल्वे स्टेशनवर सोडणे व जास्तीच्या लोकलने मुंबईला नेणे तसेच पनवेल, कर्जतपर्यंत बसने प्रवासी आणणे हा शास्त्रीय उपाय योग्य ठरला असता. तसेच लोकलने मुंबईहून येणारे प्रवासी पनवेल, खोपोलीपर्यंत आणणे व बसने लोणावळ्याला नेऊन रेल्वेला जोडणे हेदेखील सोयीचे ठरले असते. ट्रान्सफरसाठी लागणारा जास्तीचा वेळ वाढवून सर्व रेल्वे चालू राहिल्या असत्या. त्याऐवजी अनेक गाड्या रेल्वेने कॅन्सल केल्या. सोयच बंद. काही गाड्या पुण्यापर्यंत चालवल्या. खरे तर मुंबईचे प्रवासी पुण्यात येऊन काय करणार? त्यामुळे मागणी मुंबईची, पुरवठा पुण्याचा म्हणजे ‘आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी’ हा आडमुठा व्यवहार होय. किती करोडचे नुकसान झाले, याचा अंदाज करणेही कठीण.

एकदा पावसाळ्यात मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस बदलापूर-कर्जत दरम्यान पुराच्या पाण्यात अडकली. दुसर्‍या दिवशी सकाळी प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. रेल्वे आता दोन दिवस तरी चालू होणार नाही म्हणून रोडवर येऊन मिळेल त्या वाहनाने प्रवासी निघून गेले. त्यावेळी रेल्वेने एसटीला कॉल करून सांगितले असते तर एकामागून दुसरी अशा बसेस ताबडतोब निघाल्या असत्या. प्रवासी, साहित्य, लहान मुले, म्हातारी माणसे यांचा अशा हजारोंचा पुढचा प्रवास, खाणे-पिणे याचा विचारच झाला नाही. रस्त्यातल्या हॉटेलवाल्यांना आगाऊ माहिती देऊन व्यवस्था करता आली असती. हजारो लोकांना टॉयलेटची व्यवस्था नसणे ही किती मोठी अडचण. एसटीचा हॉटेल - ढाबे यांच्याशी समन्वय असतो. एका पाठोपाठ एक गाड्या आगाऊ बुकिंग करून रस्त्यातील ढाब्यांना देऊन टॉयलेटचीही सोय झाली असती. प्रवाशांना विलंबाने का होईना, पण सर्व सोयी मिळाल्या असत्या. यावरून मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट शास्त्र वापरणे किती गरजेचे आहे हे ध्यानात येऊ शकेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news