

गणेश शिंदे
मुंबई: गणपतीला नैवेद्य म्हणून विशेषत: सर्वाधिक पेढा व लाडू गणेश भक्तांकडून अर्पण केले जातात. ऑगस्ट महिन्यात साखर आणि त्यानंतर एक सप्टेंबरपासून म्हशीच्या दूधाचे दर वाढले. या दरवाढीचा परिणाम विविध प्रकारच्या पेढे व लाडूच्या दरावर झाला. पेढे सरासरी प्रतिकिलो १५ टक्यांनी महागले असून याची झळ गणेश भक्तांच्या खिशाला बसली आहे.
पेढ्याच्या दरात वाढ झाली असली तरी गणेशोत्सवाच्या काळात इतरवेळेपेक्षा ५ टक्के जादा ग्राहक वाढल्याचे मुंबईतील मुंबईतील दादर, भुलेश्वर, काळबादेवी परिसरातील प्रमुख विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
गेल्या महिन्यात साखरेचे दर सुमारे ७० रुपये प्रतिकिलोवर गेले. एक सप्टेंबर २०२६ पासून म्हैशी दुधाच्या दरात तब्बल ९ रुपयांनी लिटरमागे वाढ झाली आहे. शंभर रुपयांच्या पुढे हा दर पोहोचला आहे.
दूध आणि साखर यासारख्या प्रमुख कच्च्या मालाच्या किंमती वाढल्याने त्याचा परिणाम पेढे यावर झाला.गणपतीला नैवेद्य व गणेश भक्तांकडून पेढे,विविध प्रकारचे मोदक व लाडूचा प्रसाद दाखवला जातो.
मोदकाच्या पेढ्यांना सर्वाधिक मागणी
गणेशोत्सव काळात साधे व विविध प्रकारच्या मोदकाच्या पेढ्यांना सर्वोधिक मागणी आहे. पेढे व इतर दुग्धजन्य मिठाई आम्ही स्वत: तयार करतो. पेढ्याचे दर २० टक्क्यानी वाढले आहेत.
गणेशोत्सव संपेपर्यंत सर्व प्रकारच्या पेढ्यांची विक्री होत असल्याची माहिती दादर (पश्चिम) येथील एन.सी.केळकर रोडवरील विक्रेत्यांनी दिली. लाडू-पेढे महागले असले तरी विक्रीमध्ये घट झाली नसल्याने व भक्तांचा उत्साह कायम असल्याचे व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितले.
मोतीचूरच्या लाडवांनाही मागणी
सोमवारी घरगुती गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर व त्यापुर्वी सर्वप्रकारच्या पेढ्यांना सर्वाधिक आणि मोतीचूर लाडूची विक्री झाली.दूध व साखरेचे दर वाढल्याने पेढेचे दर किलोमागे सरासरी १५ टक्क्यांनी वाढले.साखर व दूध दरवाढ होण्यापूर्वी बाजारात पेढा हा ४०० ते ५०० रुपयांच्या घरात होता.
सध्याचे दर (प्रतिकिलो) :
साधा दूध/ मावा पेढा ४८० किलो
मावा मोदक ५२० रुपये
मलई पेढा ६००किलो
केसर पेढा ७२० रुपये
मथुरा पेढा ८०० रुपये
काजू मोदक १००० रुपये
साधे लाडू २८० रुपये
मोतीचूर लाडू ७२० रुपये