

मुंबई : सात दिवस घरगुती गणपतींची मनोभावे सेवा केल्यानंतर मंगळवारी भावपूर्ण वातावरणात मुंबईकरांनी निरोप दिला. आता अनंतचतुर्थी दिवशी लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबई सज्ज झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात ७० नैसर्गिक स्थळांसह सुमारे २९० कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत.
महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन व्यवस्थेसाठी जवळपास १० हजार अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी २४५ नियंत्रण कक्ष देखील कार्यरत असतील अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. विसर्जन स्थळांवर भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी २३६ प्रथमोपचार केंद्रे आणि ११५ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश मिळावा यासाठी ६,१८८ फ्लडलाईट आणि शोधकार्यासाठी १३८ सर्चलाईट लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर नागरिकांच्या सोयीसाठी १९७ तात्पुरती शौचालये देखील उभारण्यात आली आहेत. अग्निशमन दलाची सुसज्ज वाहने तैनात करण्यात आले आहे.
सकाळी ११. ०९ वाजता ४.२० मीटर उंचीची भरती.
संध्याकाळी ५. १३ वाजता १.४१ मीटर उंचीची ओहोटी.
रात्री ११. १७ वाजता ३.८७ मीटर उंचीची भरती.
११७५ स्टील प्लेट्स -चौपाट्यांवरील वाळूत वाहने अडकू नयेत म्हणून खबरदारी
६६ जर्मन तराफे - छोट्या मूर्तीच्या विसर्जनासाठी.
२१७८ जीवरक्षक आणि ५६ मोटरबोटी - सुरक्षेसाठी.
५९४ निर्माल्य कलश निर्माल्य
संकलनासाठी.
३०७ निर्माल्य वाहने जमा झालेले निर्माल्य नेण्यासाठी.
१२९ निरीक्षण मनोरे - गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी.
४२ क्रेन - मोठ्या मूर्तीसाठी.
२८७ स्वागत कक्ष भाविकांच्या मदतीसाठी
ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर 'ब्लू बटन जेलीफीश' आणि 'स्टिंग रे' माशांचा वावर वाढतो. यामुळे दंश होण्याची शक्यता असते. अशा घटना घडल्यास त्वरित जवळच्या वैद्यकीय कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.