पुणे: पुण्याच्या वैभवी गणेशोत्सवाचा समारोप शनिवारी होणार आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. नागरिकांना बाप्पांचे पूजन व विसर्जन कोणत्याही अडथळ्याशिवाय व पर्यावरणपूरक पद्धतीने करता यावे तसेच विविध ठिकाणांहून येणार्या पर्यटकांसाठी महापालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत.
शहरात विविध ठिकाणी विसर्जन हौद तयार करण्यात आले आहे. तसेच निर्माल्य संकलनासाठीदेखील महापालिकेने यंत्रणा तैनात केली आहे. गडबड व गैरप्रकार टाळण्यासाठी सुरक्षादेखील चोख ठेवण्यात येणार आहे. (Latest Pune News)
शनिवारी गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. पुण्यात गणराया वैभवी मिरवणुका काढण्यासाठी मंडळांनी देखील तयारी करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेने देखील गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण केली आहे. नागरिकांनी मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये न करता पर्यायी कृत्रिम विसर्जन हौदातच करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण 38 बांधलेले हौद, एकूण 281 ठिकाणी 648 लोखंडी टाक्यांमध्ये मूर्ती विसर्जनाची सोय केली आहे. तर निर्माल्य संकलनासाठी 328 निर्माल्य कलश/कंटेनरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मूर्तीसंकलनासाठी 241 केंद्र तयार करण्यात आले आहेत. गणेश विसर्जनानंतरची शाडूची माती संकलित करून त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे.
क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण 46 ठिकाणी शाडू मूर्ती संकलन केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत. क्षेत्रीय कार्यालयांमार्फत संकलित केलेल्या गणेश मूर्तींचे पुनर्विसर्जन वाघोली येथील खाणीमध्ये केले जाणार आहे. त्यासाठी तीन पाळ्यांमध्ये सेवक व अधिकार्यांची तसेच सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे.
तसेच मोटारवाहन विभागातर्फे आवश्यक वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा एकूण 554 फिरत्या शौचालयांची मागणी क्षेत्रीय कार्यालयामार्फत करण्यात आली असून, त्यानुसार पुरवठा केला आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.