MSRTC suspension : कर्तव्यावर मद्यपान करणारे एसटीचे 7 कर्मचारी निलंबित
मुंबई : कर्तव्य बजावत असताना मद्यपान केल्याचे निर्दशनास आल्यानंतर एस टी महामंडळाच्या सात कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामध्ये 1 चालक आणि 4 यांत्रिक कर्मचाऱ्यांसह एकूण 7 जणांचा समावेश आहे.
काही कर्मचारी कर्तव्यावर असताना मद्यपान करून गैरवर्तन करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने एसटीच्या सुरक्षा व दक्षता खात्याला तातडीने मोहीम राबवून अशा मद्यपी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्यभरात एकाच वेळी कोणतीही पूर्वकल्पांना न देता कडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणी मोहिमेत सापडलेल्या मद्यपी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत संशयास्पद एकूण 719 चालक, 524 वाहक आणि 458 यांत्रिक कर्मचारी अशा सुमारे 1701 कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत दोषी आढळलेल्या 7 कर्मचाऱ्यांवर दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत. संबंधित कर्मचारी या व्यापक तपासणी मोहिमेदरम्यान, कर्तव्य बजावत असताना मद्यपान केल्याचे आढळून आले. त्यामध्ये 1 चालक आणि 4 यांत्रिक कर्मचाऱ्यांसह एकूण 7 कर्मचारी निलंबित झाले आहेत.

