

मुंबई : निवडणूक आयोगाने बुधवारी अधिकृत परिपत्रक काढून प्रभाग आरक्षण नव्याने काढण्यात येईल असे जाहीर केले आहे. त्यामुळे आतापर्यंत केलेली मतपेरणी वाया तर जाणार नाही ना, या चिंतेने माजी नगरसेवकांची झोपमोड झाली आहे. कोणता प्रभाग आरक्षणात जाईल, याचा कोणीही अंदाज बांधू शकत नसल्याने दिग्गजांचे टेन्शन वाढले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत प्रभाग आरक्षण चक्राणुक्रमानुसार होत होते. मागील निवडणुकींचा विचार करून आरक्षण काढले जात होते. तीन निवडणुकीमध्ये एखादा प्रभाग आरक्षणामध्ये असेल तर तो प्रभाग खुल्या प्रवर्गासाठी करण्यात येत होता. एवढेच नाही तर मागील निवडणुकीचे आरक्षणही बदलले जात होते. त्यामुळे आपला प्रभाग आरक्षणामध्ये जाणार का खुल्या प्रवर्गामध्ये राहणार याचा अंदाज नगरसेवकांनी बांधला होता.
त्यानुसार माजी नगरसेवकांनी व इच्छुकांनी प्रभागात मतपेरणीही केली होती. मात्र यावेळी प्रथमच प्रभाग आरक्षण पूर्णपणे नव्याने काढण्यात येणार आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीमध्ये 210 चिठ्ठ्या टाकण्यात येणार आहेत. यातून ओबीसी, ओबीसी महिला, खुल्या प्रवर्गातील महिला यांचे आरक्षण काढण्यात येणार आहे. त्यामुळे नेमका कोणता प्रभाग आरक्षणात जाईल, हे सांगता येणार नाही.
210 - चिठ्ठ्या आरक्षण सोडतीमध्ये टाकण्यात येणार आहेत.
खुल्या प्रवर्गात 60 पेक्षा जास्त माजी नगरसेवक
2017 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत 60 पेक्षा जास्त खुल्या प्रवर्गातील नगरसेवक निवडून आले होते. यात अनेक ज्येष्ठ नगरसेवकांचा समावेश आहे. पालिका निवडणुकीत खुल्या प्रवर्गासाठी 75 प्रभाग शिल्लक राहणार आहेत. पण हे प्रभाग सध्याच्या 60 खुल्या प्रवर्गातील माजी नगरसेवकांच्या वाट्याला येतीलच असे नाही.
माजी नगरसेवक खुल्या प्रवर्गाचा असेल व त्याच्या प्रभागात आरक्षण पडल्यास त्याला तो प्रभाग सोडावा लागेल. मात्र 2017 मध्ये एखादा प्रभाग ओबीसी आरक्षणांमध्ये असेल, तो खुला झाल्यास ओबीसी असलेल्या माजी नगरसेवकालाही निवडणूक लढता येऊ शकते. किंवा तो प्रभाग महिला आरक्षणात गेला तरी ओबीसी असलेल्या माजी नगरसेवक यांच्या पत्नीला निवडणूक लढता येऊ शकते. पण खुल्या प्रवर्गातील माजी नगरसेवकांना मात्र आरक्षण प्रभागांमध्ये कुठेही निवडणूक लढता येणार नाही.