

मुंबई : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १८९३ रोजी देशवासीयांमध्ये एकतेची भावना निर्माण होऊन स्वातंत्र्यलढ्याला अधिक बळकटी देण्यासाठी गिरगावातल्या खाडीलकर रोड मार्गावरच्या केशवजी नाईकांच्या चाळीत गणपतीची स्थापना करत सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली होती. आज केशवजी नाईकांच्या चाळीतल्या पहिल्या सार्वजनिक गणेशउत्सवाला १३३ वर्षे पूर्ण होत आहेत. या मंडळाची वाटचाल आता दीड शतकाकडे दिशेने सुरू झाली आहे.
गणेशउत्सव काळात एक दिवस महिलांना तर एक दिवस तरुण मंडळींना गणपतीची सर्व कामे हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. अत्यंत साधी व देखणी सजावट गणेशोत्सवाच वैशिष्ट्य आहे. कोणताही गाजावाजा न करता हा गणेशोत्सव साजरा केला जातो. येथे मोठ्या प्रमाणात मराठी कुटुंबे आजही तक धरून आहेत.
केशवजी नाईक यांनी १८६० दरम्यान गिरगावच्या खाडीलकर रोड मार्गावर सात चाळींची एक वसाहत बांधली होती. त्याच चाळींना केशवजी नाईकांच्या चाळी म्हणून ओळखले जाते. समाजवादी नेते एस एम जोशी, प्रबोधनकार ठाकरे, वीर वामनराव जोशी अशा मान्यवर व्यक्तींचा सहवास या चाळीला लाभला आहे.
एका सार्वजनिक सभेसाठी लोकमान्य टिळक १९०१ साली मुंबईत आलेले असताना त्यांनी अनेक मंडळांना भेटी दिल्या होत्या. त्या दौऱ्याची सुरुवात लोकमान्यनी केशवजी नाईकांच्या चाळीतून केली होती. त्यामुळे गणेशोउत्सवात व्याख्यान मालेची परंपरा आज लोकमान्य टिळकांमुळे सुरू झाली ती आजही कायम आहे. लोकमान्यांचे विचार ऐकण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. केसरी मध्ये मुंबईचा गणपत्युत्सव हा मथळ्याखाली त्यांनी छानसा लेख प्रकाशित केला होता. २००१ साली मंडळातर्फे शतकपूर्ती सोहळ्याप्रसंगी लोकमान्यची प्रतिकात्मक मिरवणूक काढण्यात आली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांची व्याख्याने गणेशोउत्सवात इथे झाली आहेत.
गिरगावातल्या खाडिलकर रोड मार्गावर वसलेल्या चाळीच्या प्रांगणात आजही २ फुट उंच गणेश मूर्तीची स्थापना केली जाते.
गणपतीच्या आगमन, विसर्जनासाठी आजही परंपरेनुसार शिशव्यापासून घडवलेल्या पालखीचा वापर केला जातो.
कोणत्याही वाहनाचा वापर केल्याशिवाय मिरवणूक काढण्याची परंपरा मंडळाने कायम राखली आहे.
सुरुवातीच्या काळात चाळी समोरील रस्त्यावर मंडपात गणपतीची स्थापना केली जात होती. पण रहदारी वाढू लागल्याने चाळीच्या मध्यभागी मोकळ्या जागेत बाप्पा विराजमान होऊ लागले. तेव्हापासून ती जागा बदलेली नाही.