

गोरेगाव (ठाणे) : अमेरिकेतील श्रुसबरीमध्ये 12 वर्षांपासून मराठी बांधव गणेशोत्सव साजरा करत आहेत. यंदा 13 वा गणेशोत्सव आहे. बालपणी भारतात अनुभवलेला गणेशोत्सव परदेशातही आपल्या मुलांना अनुभवता यावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
सुरुवातीला 30-40 लोकांचा हा उत्सव आता 200-250 जणांपर्यंत पोहोचला आहे. उत्सवात नाटक, नृत्य, संगीत, थीमवर आधारित शोभिवंत आरास, मिरवणूक, मूर्ती बनवण्याची कार्यशाळा व पंगत अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. यामुळे हा उत्सव नेहमीच रंगतदार आणि आनंददायी ठरला आहे. हा उपक्रम राबवणारे आयोजक मूळचे सारस्वती बाग सोसायटी रोड, जोगेश्वरी पूर्व येथील रहिवासी असून सध्या ते अमेरिकेत स्थायिक आहेत. परदेशात राहूनही आपली संस्कृती जपणे व नवीन पिढीस त्याचा अनुभव देणे हा यामागचा उद्देश आहे.
मालाड : गणेशोत्सव कालावधीत चारकोप सह्याद्रीनगर येथील लोखंडे कुटुंबीय दरवर्षी एकत्र येत सजावट करत सणाचा आनंद लुटतात. याचवेळी घरातील मुलांना चांगली शिकवण देण्याचा प्रयत्नही या उत्सवातून कैलास लोखंडे कुटुंबीय गेल्या पाच वर्षांपासून करीत आहेत.
यंदा या कुटुंबाने आपल्या गणपतीच्या देखव्यातून वारीचा देखावा साकारला आहे. त्यासाठी प्रतिपंढरपूर उभारले आहे. विशेष म्हणजे हा देखावा बनवताना पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करत त्यांनी मुलांना पर्यावरण संवर्धनाचा धडा दिला आहे.
या कुटुंबियांकडून दरवर्षी सजावटीत नवनवीन प्रयोग केले जातात.त्यांनी गेल्या वर्षी चंद्रावरील वातावरणाची सजावट केली होती. यंदा भक्तीमय वारीची संकल्पना साकारली आहे. या सजावटीद्वारे त्यांनी भक्तीभाव आणि परंपरेचे दर्शन घडवले आहे.
घाटकोपर : घाटकोपरमधील सार्वजनिक उत्सव सेवा समितीच्या गणेशोत्सवाचे यंदाचे 45 वे वर्ष आहे. मंडळाने यंदा भव्य रायगडाचे मुख्य प्रवेशद्वार व सिंहासनामागील स्वरूप उभारले असून यात प्रसिद्ध मूर्तिकार नचिकेत नामदेव आदक यांनी साकारलेली रेखीव 7 फुटाची बाप्पाची मूर्ती विराजमान करण्यात आली आहे.
संस्थापक माजीद शेख, ज्ञानेश्वर पुंडे, मंडळाचे अध्यक्ष मयुर भोर, सचिव दत्ता साडविलकर, खजिनदार राकेश कदम यांच्या नेतृत्वात मंडळाने यंदा विविध सामाजिक उपक्रमांची आखणी केली आहे. डोंगराळ काजुटेकडी हनुमान मंदिर येथे असलेल्या या विभागात मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कर्तव्यामुळे स्ट्रेचर व व्हीलचेअर अर्पण करण्यात आली आहे.याचबरोबर रक्तदान शिबिर, महिला सशक्तीकरण कार्यक्रम आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.
मालाड : मालवणीचा राजा श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना 1966 साली झाली. मालाडमधील हे पहिले मंडळ यंदा हिरक महोत्सव साजरा करत आहे. या मंडळातर्फे सामाजिक बांधिलकी व संस्कृती जपत लहान मुलांना प्रबोधन व क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. तसेच महिलांना खेळ पैठणीचा या विशेष आकर्षण असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
विशेष म्हणजे हे मंडळ सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन कार्यरत असते. यावेळी मंडळाच्या कायर्र्कर्त्यांनी हिरक महोत्सवानिमित्त स्वत: प्रत्येकी 6 हजार रुपये सहयोग निधी म्हणून दिला. गणेश आगमनापूर्वीपासून ते विसर्जनापर्यंत सर्वच कामात मंडळाच्या सर्वधर्मीय कार्यकर्त्यांचा सहभाग असतो. याच कारणामुळे मालवणीचा राजा हा सर्वधर्मसमभावचे प्रतीक मानला जातो.