

मुंबई ः नरेश कदम
सत्तारूढ भाजपला प्रामाणिकपणे विरोध करणाऱ्या काँग्रेसने लातूर, कोल्हापूर, चंद्रपूर, परभणी, भिवंडी, या महापालिकेत मुसंडी मारली आहे. एकीकडे भाजपने बहुतांश महापालिका काबीज केलेल्या असताना, या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी उजवी झाली आहे.
नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. तर 29 महापालिकेच्या निवडणुकीत पाच महापालिकेत काँग्रेस सत्तेच्या जवळपासपोचला आहे. पाच महापालिकेत काँग्रेस सत्ता काबीज करेल. कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसने 37 जागा जिंकल्या आहेत. विधानपरिषदेचे काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी भाजपचे आव्हान मोडून विजयाची किमया केली आहे. त्यांनी मुत्सद्दीपणे ही निवडणूक लढवली . त्याला यश आले.
लातूर महापालिका निवडणूकीत काँग्रेसने वंचितसोबत सत्ता मिळविली आहे. आमदार अमित देशमुख यांना याचे श्रेय जाते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी, दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नांव पुसून टाकू , असे वादग्रस्त वक्तव्यकेले होते. त्याचा मोठा फटका भाजपला बसला . त्यातच लातूर भाजपमधील अंतर्गत बंडाळीने भाजपचाघात केला . लातूरकरांनी देशमुख कुटुंबाच्या हाती सत्तेची चावी दिली आहे.
चंद्रपूर महापालिकेच्या सत्तेचे दरवाजे काँग्रेससाठी उघडले आहेत. सर्वाधिक जागा काँग्रेसने जिंकल्या असून ते महापालिकेत सत्ता स्थापन करतील. विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टी वार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर मध्ये सत्ता खेचून आणली आहे. तर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्या भांडणाचा फटका भाजपला बसला आहे.
भिवंडी महापालिकेत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या असून शरद पवार गट आणि अन्य छोट्या पक्षांना घेवून सत्ता स्थापन करतील. पण नागपूर , नांदेड, अकोला, अमरावती या महापालिकांमध्ये काँग्रेसने चांगले यश मिळविले असून मित्रपक्षांना सोबत घेवून सत्तेत सहभागी होवू शकतील , असा काँग्रेसच्या नेत्यांनी दावा केला आहे.