

मुंबई : मुंबईमध्ये ठाकरे ब्रॅण्डला मुंबईकरांनी नाकारले असून तेथे महायुतीचा महापौर होणार आहे. राज्यातील महापालिका निवडणुकांमध्येही शिवसेना-भाजप महायुती बहुमताच्या उंबरठ्यावर असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबईकरांनी आणि राज्यातील जनतेने दिलेला कौल आम्ही पूर्णपणे मान्य करतो. जिथे युती आहे, तिथे सत्ता स्थापन करणार आणि जिथे वेगळी समीकरणे आहेत, तिथे परिस्थितीनुसार निर्णय घेणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीदरम्यान काही ठिकाणी भावनिक मुद्दे, भ्रष्टाचाराचे आरोप आणि विविध प्रकारचा प्रचार करण्यात आला. मात्र, मुंबईकरांनी आणि राज्यातील मतदारांनी भावनिकतेपेक्षा विकासालाच कौल दिला आहे. विकासविरोधी भूमिका घेणाऱ्यांना जनतेने नाकारले असून, विकास हाच ब्रँड जनतेने स्वीकारला असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने (उबाठा) 150 हून अधिक जागा लढवून सुमारे 60 जागा जिंकल्या, मात्र एकंदरीत जनतेने विकासाच्या अजेंड्यालाच पाठिंबा दिल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता अशा ट्रिपल इंजिन सरकारचा मुंबईला मोठा फायदा होणार असल्याचेही शिंदे म्हणाले.
आम्हाला केवळ महापौरपद किंवा सत्तेची खुर्ची महत्त्वाची नाही, तर मुंबईकरांच्या जीवनात बदल घडवायचा आहे. मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत परतावा, ही आमची भूमिका आहे. राज्यभरात महायुती बहुमताच्या जवळ पोहोचली असून, अनेक महापालिकांमध्ये महायुतीचे महापौर होतील. जनतेने विकासाचा कौल दिला आहे आणि त्याच विश्वासावर सरकार पुढील काळात मुंबई आणि महाराष्ट्राचा वेगाने विकास करेल, असेही त्यांनी सांगितले.
या निकालामध्ये लाडक्या बहिणींचा मोठा सहभाग असल्याचे त्यांनी नमूद करत त्यांच्या योगदानाबद्दल विशेष आभार मानले. शिवसेना आणि भाजपची विचारधारा एकच असून, त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आमचा अजेंडा साधा आणि स्पष्ट आहे. विकास, विकास आणि विकास, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.