

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील उपाहारगृहात ३ जुलै रोजी एका ग्राहकाला दिलेल्या ताकाच्या ग्लासात चक्क माशी, तर कांदा भजीत प्लास्टिकचा धागा आढळल्याने उपाहारगृहाची स्वच्छता व अन्नसुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे महानगरपालिका मुख्यालयात खळबळ उडाली असून सदर उपहारगृह चालकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
येथील उपहारगृहात दररोज जेवण व नास्ता करण्यासाठी हजारो अधिकारी, कर्मचारी, पोलीस व अभ्यागत येत असतात. परिणामी या घटनांमुळे या सर्वांच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील उपाहारगृहाचे संचालन कमल कॅटरर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे आहे. मुख्यालयात पाच हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून, विविध कामांसाठी येणारे नागरिक तसेच आझाद मैदान परिसरातील बंदोबस्तावरील पोलीसही याच उपाहारगृहात नाश्ता आणि भोजन करतात.
या प्रकाराबाबत कमल कॅटरर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकांकडे विचारणा केली असता त्यांनी अधिक भाष्य करण्यास टाळाटाळ केली. मात्र, अशी चूक पुन्हा होणार नाही आणि आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.